esakal | परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना १५ दिवस सक्तीचे होम क्वारंटाइन
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Test

परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना १५ दिवस सक्तीचे होम क्वारंटाइन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - रेल्वेने महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्याचा राज्य सरकारने घेतला आहे. तपासणीच्या वेळी ४८ तासांमधील रिपोर्ट सादर करण्याचे बंधन त्यांच्यावर करण्यात आले आहे. तसेच परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना १५ दिवस सक्तीचे होम क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. त्यासाठी त्यांच्या हातावर स्टॅंप मारण्यात येणार आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे रेल्वे प्रवाशांसाठी राज्य सरकारने नवी नियमावली तयार केली आहे. राज्य सरकारचा आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि रेल्वे प्रशासन यांच्याकडून या नियमावलीची अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी तिन्ही यंत्रणांमध्ये संवाद सुरू झाला आहे. अल्पावधीतच अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली. पुणे विभागातील पुणे स्थानक, कोल्हापूर, मिरज, सांगली, सातारा आदी स्थानकांवर त्यासाठी सेटअप उभारण्यात येणार आहे.

हेही वाचा: Corona Update: राज्यात रुग्णांच्या संख्येत घट; 351 जणांचा मृत्यू

प्रवाशांसाठी नियमावली

- प्रत्येक प्रवाशाने रेल्वेतही मास्क वापरणे बंधनकारक

- कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वेत प्रवेश मिळणार

- सोशल डिन्स्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन प्रवाशांना करावे लागणार

- गर्दी टाळण्यासाठी प्रवाशांनी प्रवासापूर्वी ९० मिनिटे अगोदर स्थानकावर यावे

- परराज्यातून रेल्वे येण्यापूर्वी चार तास अगोदर आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थानकावर कार्यान्वित होणार

- परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर स्टॅम्प मारले जाणार

- राज्यातील स्थानकांवर प्रवाशांच्या तपासणीसाठी थर्मल स्कॅनर सक्तीचे

- राज्यातील स्थानकांवर प्रवाशांसाठी ॲन्टिजेन चाचणीचे केंद्र उभारणार

- रेल्वेतून आलेल्या प्रवाशांसाठी राज्य सरकारने स्थानिक सार्वजनिक वाहतूक पुरविणे बंधनकारक

- स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची चाचणी होणार

हे लक्षात असू द्या

  • परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांकडे आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल नसल्यास त्यांची राज्यातील रेल्वे स्थानकांवर रॅपिड ॲन्टिजेन चाचणी होणार

  • त्यात संबंधित प्रवाशाची चाचणी निगेटिव्ह आली तरी, त्याला १५ दिवसांचे होम आयसोलेशन सक्तीचे

  • जर त्याच्यात कोरोनाची काही लक्षणे आढळली तर, त्याला क्वारंटाइन सेंटर किंवा रुग्णालयात दाखल करण्यात येईल

  • हातावर स्टॅम्प मारल्यावर, होम आयसोलेशनचे प्रवाशाने उल्लंघन केल्यास तत्काळ एक हजार रुपये दंड

loading image