राज्यात १५ हजार ग्रंथालये सुरू करणार - चंद्रकांत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil

राज्यातील १५ हजार गावांमध्ये ग्रंथालय सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. यासाठी सन २०१२ पासून बंद असलेली ग्रंथालय नोंदणी पुन्हा सुरू केली आहे.

Library : राज्यात १५ हजार ग्रंथालये सुरू करणार - चंद्रकांत पाटील

खडकवासला - राज्यातील १५ हजार गावांमध्ये ग्रंथालय सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. यासाठी सन २०१२ पासून बंद असलेली ग्रंथालय नोंदणी पुन्हा सुरू केली आहे. शिवाय सध्या कार्यरत असलेल्या ग्रंथालयांना सक्षम करण्यासाठी वर्गवारीनुसार या ग्रंथालयांच्या अनुदानात ६० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (ता. २४) येथे बोलताना सांगितले.

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान आयोजित २२ व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे उद्‍घाटन पाटील यांच्या झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, स्वागताध्यक्ष, माजी उपमहापौर दिलीप बराटे, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, गरवारे टेक्निकल फायबरचे महाव्यवस्थापक अभय बारटक्के, बालसाहित्यक डॉ. संगीता बर्वे, माजी खासदार अशोक मोहोळ आदी उपस्थित होते.

पाटील पुढे म्हणाले, ‘राज्यातील ग्रामपंचायतींच्या गावात ग्रंथालये सुरू केली जाणार आहेत. शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात पैसा कसा वाढेल. यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत.’ बराटे यांनी प्रास्ताविक केले. वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.

श्वेतपत्रिका प्रसिद्ध करा - पाटील

राज्यात कोणाचेही सरकार असले तरी राजघराणे आणि राजकारणी चेहरे सगळीकडे तेच असतात. हीच परिस्थिती आता साहित्यिकांच्या बाबतीत होत आहे. काही ठरावीक साहित्यिक सगळीकडेच दिसतात. त्यामुळे गेल्या तीन दशकांत जाहीर झालेले उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार आणि निवड समितीतील साहित्यिकांच्या यादीबाबतची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी. म्हणजे सगळे चित्र स्पष्ट होईल, अशी मागणी २२ व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी या वेळी केली. कुसुमाग्रजांसारख्या मराठीतील लेखकाला ज्ञानपीठ मिळू नये, म्हणून राजकारण झाले. मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांनादेखील ज्ञानपीठ पुरस्कारापासून पासून वंचित ठेवल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.