लॉकडाउनचा झटका..! विडी उद्योगाला "इतक्‍या' कोटींचा फटका; कामगारांचे 80 कोटी तर सरकारचेही 42 कोटींचे नुकसान 

श्रीनिवास दुध्याल 
Thursday, 30 July 2020

धूम्रपान विरोधी कायद्याला विरोध म्हणून विडी कंपन्यांनी सोलापुरात एप्रिल 2016 मध्ये एक महिना संप पुकारला होता. त्या वेळी कामगारांची रोजीरोटी हिरावली गेल्यामुळे काही महिलांनी मोर छाप पिवळा रंग पिऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. त्यानंतर या वर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर 23 मार्चपासून 15 जूनपर्यंत तसेच या महिन्यात (जुलै) पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाउन करण्यात आल्यामुळे रविवारच्या सुट्या वगळून जवळपास 80 दिवस विडी उद्योग बंद होता. या कालावधीत या उद्योगातील जवळपास 160 कोटींची उलाढाल ठप्प झाली, जी या उद्योगाच्या इतिहासात कधी झाली नव्हती. 

सोलापूर : शहरातील पूर्वभाग व मध्यवर्ती भागातील महिलांना वर्षानुवर्षे हक्काचा रोजगार देणारा उद्योग म्हणून विडी उद्योगाची सोलापुरात ख्याती आहे. या उद्योगात जवळपास 45 हजार नोंदणीकृत महिला कामगार कार्यरत असून, त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह या उद्योगामुळेच चालतो. मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर जवळपास 80 दिवसांच्या लॉकडाउनचा फटका बसून, कामगारांची मजुरी व विडी कंपन्यांचे उत्पादन असे मिळून 160 कोटींची उलाढाल ठप्प झाली. सोलापुरातील विडी उद्योगाच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे नुकसान असल्याचे विडी उत्पादकांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा : तो आला, त्यानं पाहिलं अन्‌ तिघांना आपलंसं केलं..! "या' ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण 

सोलापूर शहरात वर्षानुवर्षांपासून विडी उद्योगात महिलांना रोजगार मिळत आहे. यासाठी शिक्षण गरजेचे नसून विड्या वळण्याचे कौशल्य हेच विडी कामगारांचे प्रमाणपत्र ठरते. विडी कामगारांना प्रॉव्हिडंट फंड, आरोग्य विमा, बोनस, हक्करजा अशा सर्व सवलती मिळतात. निवृत्तीनंतर निवृत्तिवेतन मिळत असल्याने वृद्धापकाळही सुखावह जाते, त्यामुळे आजही सुशिक्षित बेरोजगार महिलांनाही विडी उद्योग सहारा बनला आहे. विशेष म्हणजे कच्चा माल ब्रॅंचमधून घेऊन घरी बसून विड्या वळण्याचे काम असल्याने महिलांना दिवसभर घरातील सर्व कामे करत विड्या वळून रोजगार मिळवणे सोयीचे ठरते. बारमाही काम मिळत असल्याने आजही विडी कामगार असल्याचे कार्ड असले की युवतींचे विवाह लगेच ठरतात. यावरून सोलापुरात विडी उद्योगाचे महत्त्व अधोरेखित होते. 

हेही वाचा : मोठी बातमी ! "एमपीएससी'च्या मुख्य परीक्षा आता ऑनलाइन 

इतिहासात पहिल्यांदाच मोठी उलाढाल ठप्प 
धूम्रपान विरोधी कायद्याला विरोध म्हणून विडी कंपन्यांनी सोलापुरात एप्रिल 2016 मध्ये एक महिना संप पुकारला होता. त्या वेळी कामगारांची रोजीरोटी हिरावली गेल्यामुळे काही महिलांनी मोर छाप पिवळा रंग (सडा मारण्यासाठी पिवळ्या रंगाचे रसायन) पिऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. (या घटनांनंतर मोर छाप पिवळा रंगावर बंदी घालण्यात आली.) त्यानंतर या वर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर 23 मार्चपासून 15 जूनपर्यंत तसेच या महिन्यात (जुलै) पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाउन करण्यात आल्यामुळे रविवारच्या सुट्या वगळून जवळपास 80 दिवस विडी उद्योग बंद होता. या कालावधीत या उद्योगातील जवळपास 160 कोटींची उलाढाल ठप्प झाली, जी या उद्योगाच्या इतिहासात कधी झाली नव्हती. 

उद्योजक, कामगार व सरकारलाही बसला फटका 
विडी उद्योगात दररोज दोन कोटींची उलाढाल होत असते. मात्र 80 दिवसांच्या लॉकडाउनमध्ये हा उद्योग पूर्णत: बंद राहिल्याने 160 कोटींची उलाढाल ठप्प झाली. यात कामगारांच्या 80 कोटी रुपयांच्या मजुरीचे नुकसान झाले आहे. विडी उद्योगातून सरकारला 28 टक्के जीएसटी मिळतो. मात्र 160 कोटींची उलाढाल ठप्प झाल्याने सरकारचेही जवळपास 45 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

ठळक 

  • शहरातील विडी कंपन्या : 15 
  • कंपन्यांचे शहरातील एकूण ब्रॅंचेस : 129 
  • विडी उद्योगातील कामगार संख्या : 45 हजार 
  • रोजच्या विड्यांचे उत्पादन : 252 कोटी 
  • रोजची उलाढाल : दोन कोटी 

याबाबत सोलापूर विडी उद्योग संघाचे सचिव सुनील क्षत्रिय म्हणाले, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या लॉकडाउनमुळे जवळपास 80 कामाचे दिवस बुडाल्याने उद्योजकांसह कामगारांचेही मोठे नुकसान झाले आहे, जे याआधी कधी झाले नव्हते. विडी उद्योगातून सरकारला 28 टक्के जीएसटी मिळत होता, ती 45 कोटींची रक्कमही सरकारकडे जमा होऊ शकली नाही. एकूणच, दीर्घ कालावधीपर्यंत विडी उद्योग बंद राहिल्याने सर्वांनाचा याचा खूप मोठा फटका बसला आहे. 

महाराष्ट्र 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 160 crore blow to bidi industry; 80 crore loss to workers and 42 crore loss to government