
पोलिस भरतीसाठी १८.४७ लाख अर्ज! एकापेक्षा अधिक अर्ज भरलेल्यांची एकाच केंद्रावर परीक्षा
सोलापूर : पोलिस भरतीच्या माध्यमातून राज्यात १८ हजार ३३१ पदांची भरती होणार आहे. सहा-सात वर्षांपासून शासकीय मेगाभरती निघाली नसल्याने पोलिस भरतीसाठी तब्बल १४ लाख ४७ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. एका जागेसाठी तब्बल ७९ उमेदवारांमध्ये स्पर्धा पहायला मिळणार आहे. सर्वांची एकाचवेळी परीक्षा होणार आहे.
राज्यात सध्या सर्वच विभागांची पदभरती निघाली आहे. जवळपास ७५ हजार पदे भरली जात आहेत. त्यामुळे बहुतेक तरुण- तरुणांनी पोलिस भरती बरोबरच अन्य भरतीसाठी देखील तयारी सुरू केली आहे. 'काहीही होऊ दे पण आता यावर्षी नोकरी मिळवायचीच' असा संकल्प करून ते मेहनत करत आहेत. दरम्यान, पोलिस भरती संपल्यावर किंवा कदाचित काही जिल्हा परिषदेची भरती पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेवेळी होऊ शकते. जानेवारीत मैदानी आणि १५ ते २० फेब्रुवारीपूर्वी लेखी परीक्षा होईल. त्यानंतर दहावी-बारावी मुलांच्या परीक्षा सुरू होतील. उमेदवारांची संख्या पाहता परीक्षांना थोडा वेळ लागू शकतो. एका जागेसाठी १० म्हणजेच १८ हजार ३३१ जागांसाठी १४ लाख ४७ हजार अर्जदारांपैकी एक लाख ८३ हजार ३१० जणांची निवड लेखी परीक्षेसाठी होईल. त्यामुळे स्पर्धा मोठी असून या भरतीसाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक अशा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक अर्जदार आहेत.
एकापेक्षा अधिक फॉर्म भरले असतील तर...
पोलिस भरतीच्या माध्यमातून यंदा तब्बल १८ हजार ३३१ जागांची भरती केली जात आहे. त्यासाठी साडेचौदा लाख उमेदवारांनी आतापर्यंत अर्ज भरले आहेत. अर्ज भरण्याची १५ डिसेंबरपर्यंत (गुरुवार) शेवटची मुदत आहे. दरम्यान, अनेक तरूण- तरुणींनी जात संवर्ग, सोयीचा जिल्हा तथा शहर कोणते, ज्याठिकाणी स्पर्धक जास्त नसतील याचा अंदाज घेऊन २-३ ठिकाणी अर्ज भरले आहेत. त्यांना तिन्ही ठिकाणचे प्रवेशपत्र मिळणार आहे. त्यापैकी कोणत्याही एका केंद्रावर त्याला परीक्षा देता येणार आहे. फॉर्म भरायची मुदत संपल्यावर अर्जांची पडताळणी होऊन डिसेंबरअखेरीस सर्व उमेदवारांना परीक्षेचे प्रवेशपत्र वितरित केले जाणार आहे.
ठळक बाबी...
पोलिस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत शेवटची मुदत
जानेवारीत सर्व उमेदवारांची एकाचवेळी सुरु होणार मैदानी परीक्षा
फेब्रुवारी महिन्यात एकाचवेळेस राज्यातील विविध केंद्रावर होईल लेखी परीक्षा
मैदानी चाचणीत किमान ४० टक्के गुण अपेक्षित; एका जागेसाठी १० जणांची होणार लेखी परीक्षेला निवड
मेरिट यादीप्रमाणे होणार अंतिम निवडी; हरकत असल्यास नोंदवण्याचा उमेदवारांना अधिकार