गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गुड न्यूज; देशातील पहिले कोरोनाग्रस्त दाम्पत्य कोरोनामुक्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

महाराष्ट्रात सर्वात प्रथम कोरोनाचे दोन रूग्ण हे पुण्यात आढळले होते. हे पती-पत्नी दुबईवरून प्रवास करून पुण्यात आले होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने पुण्यातील नायडू रूग्णालयात दाखल करण्यात आले होते व त्यांच्यावर उपचार सुरू होते.

पुणे : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घतालेले असतानाच भारताने मोठ्या प्रमाणात खबरदारी घ्यायला सुरवात केली आहे. भारत पुढील २१ दिवस लॉकडाऊन स्थितीत असेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मात्र, पुण्यात काहीसे वेगळे व दिलासादायक चित्र आहे. पुण्यात सर्वात प्रथम आढळेल्या कोरोनाग्रस्त जोडप्याची दुसरी कोरोना चाचणी ही निगेटीव्ह आली आहे, त्यामुळे त्यांना आज डिस्चार्ज देण्यात येईल. 

महाराष्ट्रात सर्वात प्रथम कोरोनाचे दोन रूग्ण हे पुण्यात आढळले होते. हे पती-पत्नी दुबईवरून प्रवास करून पुण्यात आले होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने पुण्यातील नायडू रूग्णालयात दाखल करण्यात आले होते व त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल त्यांची १४ दिवसांनंतर पहिली टेस्ट करण्यात आली, ज्यात हे दोन रूग्ण कोरोना निगेटीव्ह निघाले होते. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली होती, तर आज त्यांची दुसऱ्यांदा टेस्ट करण्यात आली, ज्यात ते पुन्हा एकदा कोरोना निगेटीव्ह निघाले. २४ तासांत दोन्ही टेस्ट निगेटीव्ह आल्याने त्यांना आज घरी सोडण्यात येईल. त्यामुळे आज या जोडप्याला डिस्चार्ज मिळणार असून, पुढील १४ दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा आदेश त्यांनी देण्यात आला आहे. यामुळे पुणेकरांना आशेचा किरण दिसत आहे, असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. 

देशात कोरोनाग्रस्त मृतांची संख्या ११ वर पोहोचली असून कोरोनाग्रस्तांची संख्या ५३६ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भारतीयांना पुन्हा एकदा संबोधित केले. यावेळी त्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून पुढील २१ दिवस कोणीही घराबाहेर पडू नये, सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये, स्वतःची व स्वतःच्या परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. त्यामुळे संपूर्ण देश हा १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनमध्ये गेला असून सर्व राज्यात संचारबंदी लागू करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 Coronavirus patient found negative after second test in Pune