‘मराठी’तील 2 लाख विद्यार्थ्यांनी धरली ‘इंग्रजी’ची वाट! ठाणे, मुंबईत मराठीच्या तुलनेत ‘इंग्रजी’चे दुप्पट ते आठपट विद्यार्थी; ZP शाळांमध्ये सेमी इंग्रजी का नाही?

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी होत असतानाच मराठी माध्यमांच्या शाळांमधील पहिली ते आठवीतील दोन लाख ३१७ विद्यार्थी एकाच वर्षात कमी झाली आहे. २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात एक लाख ८१ हजार विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमाची वाट धरली आहे.
solapur
maharashtraschool

सोलापूर : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी होत असतानाच मराठी माध्यमांच्या शाळांमधील पहिली ते आठवीतील दोन लाख ३१७ विद्यार्थी एकाच वर्षात कमी झाली आहे. २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात एक लाख ८१ हजार विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमाची वाट धरली आहे. राज्याच्या राजधानीत मराठीच्या तुलनेत इंग्रजीचे आठपट तर ठाण्यात मराठीच्या तुलनेत इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी दुप्पट असल्याचे समग्र शिक्षा अभियानाकडील माहितीवरून स्पष्ट झाले आहे.

राज्यात दोन वर्षांत मराठी माध्यमांचे पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गातील दोन लाख विद्यार्थी कमी झाले, पण विशेष बाब म्हणजे उर्दु व हिंदी माध्यमांच्या विद्यार्थ्यांमध्ये १० हजाराने वाढ झाली आहे. जळगाव, बुलढाणा, यवतमाळ, जालना, परभणी, नाशिक, नगर, बीड, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, छत्रपती संभाजी नगर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये मराठी माध्यमाचे सर्वाधिक विद्यार्थी कमी झाले आहेत. अपवाद म्हणजे मुंबई सबर्बनमध्ये ९६३ तर पुण्यात आठ हजार विद्यार्थी मराठी माध्यमाचे वाढले आहेत.

दरम्यान, ठाण्यात मराठी माध्यमाचे तीन लाख सहा हजार ९०१ तर इंग्रजी माध्यमाचे सहा लाख ८५ हजारांवर विद्यार्थी आहेत. दुसरीकडे राज्याच्या राजधानीत (मुंबईत) मराठी माध्यमाचे अवघे एक लाख ४१ हजार २४४ विद्यार्थी असून याच ठिकाणी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांची संख्या तब्बल साडेआठ लाख आहे. शिक्षणाची राजधानी असलेल्या पुण्यात मात्र मराठी (७.३० लाख) व इंग्रजी माध्यमाचे (७.१५ लाख) विद्यार्थी एकसमान आहेत.

शिक्षण आयुक्तांचा ‘समुह शाळा’ पॅटर्न कागदावरच

राज्यातील जिल्हा परिषदांच्या १४ हजार ७८३ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. त्यात १ ते ५ पटसंख्या असलेल्या १७३४ तर सहा ते दहा पटसंख्येच्या ३१३७ आणि १० ते २० पर्यंत पटसंख्या असलेल्या नऊ हजार ९१२ शाळा आहेत. कमी पटसंख्येच्या शाळांवर अंदाजे २९ हजार शिक्षक असून ‘समुह शाळा’ पॅटर्नच्या माध्यमातून कमी पटाच्या शाळा जवळील शाळेत समाविष्ठ करून पूर्वीच्या ठिकाणचे शिक्षक इतरत्र नेमून गुणवत्ता टिकवायची होती. मात्र, शैक्षणिक वर्षाची सुरवात १५ जूनपासून होत असतानाही हा पॅटर्न राबविण्यासंदर्भात कोणतेही आदेश नाहीत.

झेडपी शाळांमध्ये सेमी इंग्रजी का नाही?

राज्यात जिल्हा परिषदेच्या ६५ हजारांपर्यंत शाळा आहेत. इंग्रजी शाळांचे वाढलेले प्रस्थ आणि पालकांचा इंग्रजी माध्यमांकडे वाढलेला कल हेरून जिल्हा परिषदेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये ‘सेमी इंग्रजी’चे वर्ग सुरू करणे अपेक्षित आहे. मात्र, त्यासाठी पुन्हा शिक्षक भरती, तिजोरीवर भार पडेल म्हणून त्यासंबंधीचा निर्णय झालेला नाही. सेमी इंग्रजी सुरू झाल्यास मराठी शाळांमधील पटसंख्या कमी होणार नाही, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञांना आहे.

दोन वर्षातील माध्यमनिहाय विद्यार्थी

२०२२-२३

  • माध्यम विद्यार्थी

  • मराठी ९०,१३,३८२

  • इंग्रजी ४२,९५,२०२

  • हिंदी २,९५,४९७

  • उर्दू ९,४४,३१७

---------------

२०२३-२४

  • माध्यम विद्यार्थी

  • मराठी ८८,१३,०६५

  • इंग्रजी ४४,७६,०६०

  • हिंदी २,९८,८८४

  • उर्दू ९,५१,०९७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com