धुळे-कळवण अपघातात 21 ठार; विहिरीचे कठडे तोडून बस रिक्षासह कोसळली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

चालकाचे नियंत्रण सुटल्याने परिवहन महामंडळाच्या बससह ऍपे रिक्षा थेट विहिरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात किमान 21 जण ठार झाले असून, अन्य 33 प्रवासी जखमी झाले आहेत.

मेशी (जि. नाशिक) : चालकाचे नियंत्रण सुटल्याने परिवहन महामंडळाच्या बससह ऍपे रिक्षा थेट विहिरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात किमान 21 जण ठार झाले असून, अन्य 33 प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. येथील धोबीघाट वळणावर मंगळवारी दुपारी साडेतीनला हा अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की, ही बस विहिरीचे कठडे तोडून रिक्षासह विहिरीत पडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कळवण आगाराची धुळे- कळवण बस दुपारी साडेतीनच्या सुमारास धुळ्याहून कळवणकडे येत होती. धोबीघाट वळणावर बसचे टायर अचानक फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून ही बस समोरून येत असलेल्या ऍपे रिक्षाला धडकली. त्यामुळे ती बस ऍपेरिक्षासह कठडे तोडून विहिरीत पडली. भीषण अपघाताने घटनास्थळी एकच हाहाकार उडाला. घटनेची माहिती मिळताच सटाणा, मालेगाव येथील आपत्ती निवारण दल घटनास्थळी दाखल झाले. या वेळी नागरिकांचीही गर्दी झाल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. अपघातग्रस्त ऍपे रिक्षा ही येसगाव (ता. मालेगाव) येथील असल्याचे सांगण्यात आले. बसखाली ऍपे रिक्षा दबली गेली. काही वेळानंतर क्रेनच्या साहाय्याने बस बाहेर काढण्यात आली. त्यानंतर उशिरापर्यंत रिक्षाला बाहेर काढण्याचे काम सुरू होते. जखमींना मालेगाव येथील उपजिल्हा रुग्णालय, तसेच देवळा व उमराणे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शेरजील इमाम आपल्या राष्ट्रद्रोही भाषणात नेमका काय म्हणाला?

टायर फुटल्याने अपघात नाही
दरम्यान, या अपघातासंदर्भात प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत चौकशी केली जाणार आहे. टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची चर्चा असली, तरी महामंडळाने मात्र त्यास नकार दिला आहे. चौकशीनंतरच अपघाताचे खरे कारण समोर येईल, असे प्रभारी विभाग नियंत्रक मुकुंद कुवर यांनी सांगितले. तसेच, रुग्णालयात दाखल जखमी व अपघातातील मृत प्रवाशांना मदत करण्यासंदर्भात प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे. जखमींना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना स्थानिक आगारातील अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

देव तारी त्याला कोण मारी'
देव तारी त्याला कोण मारी' या उक्तीची प्रचिती या अपघातावेळी आली. मोरे कुटुंबातील आजी, नात आणि नातू हे तिघेही मृत्यूची छाया समोर उभी असताना, केवळ दैव बलवत्तर म्हणून मृत्यूच्या दाढेतून परत आले. सोनगीर येथील मोरे कुटुंब कामाच्या शोधात कळवण तालुक्‍यातील पगार कुटुंबीयांकडे वीटभट्टीवर कामासाठी आलेले आहे. गजराबाई मोरे (वय 60) या नात कमल (वय 10) व नातू देवेंद्र (वय 6) यांच्यासह धुळे-कळवण बसमधून प्रवास करत होते. त्या वेळी पुढे काय वाढून ठेवले आहे, याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. बस विहिरीत उभी पडल्याने विहिरीतील पाणी बसमध्ये शिरत होते आणि हे तिघेही देवीला विनवणी करीत होते. घटनास्थळी मदतकार्यासाठी आलेल्या देवदूतांनी बसमध्ये घुसून त्यांना सुखरूप बाहेर काढले. आपण देवीच्या कृपेनेच वाचलो, असे ते पुन्हा-पुन्हा सांगत होते. कमल ही इयत्ता चौथीत तर देवेंद्र पहिलीत सोनगीरच्या मराठी प्राथमिक शाळेत शिकतात.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 21 died in Dhule Kalvan bus accident; 33 injured