

तात्या लांडगे
सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांची 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार संचमान्यता केली जात आहे. डिसेंबरमध्ये संचमान्यता पूर्ण होणे अपेक्षित होती, पण अजूनही माध्यमिक विभागाकडील 2100 शाळांची संचमान्यता अंतिम झालेली नाही. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचे वेळापत्रक बदलावे लागणार आहे. त्यामुळे समायोजनानंतर शिक्षकांच्या बदल्या आणि नवीन आठ ते नऊ हजार शिक्षक भरतीसाठी जुलै उजाडणार आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७७५ शाळांसह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ६३ हजार शाळा आणि १७ हजार खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संचमान्यता सुरु आहे. दरम्यान, माध्यमिक शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार १३ फेब्रुवारी रोजी अतिरिक्त शिक्षकांची तात्पुरती यादी प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. त्यानंतर हरकती व तक्रारी नोंदवून फेब्रुवारीअखेर अंतिम यादी जाहीर व्हायला हवी होती.
मार्चमध्ये अतिरिक्तांचे समायोजन करण्याचेही वेळापत्रकात नमूद होते. मात्र, आता निम्मा मार्च संपला तरीपण अतिरिक्त शिक्षकांची तात्पुरती यादी प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षकांच्या बदल्या शाळा सुरु झाल्यावरच होतील, असेही अधिकारी सांगत आहेत.
...तर मुख्याध्यापकांचा थांबणार पगार
संचमान्यतेच्या नव्या शासन निर्णयानुसार पटसंख्येअभावी माध्यमिक शाळांमधील ६ ते ७ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त होतील, असा अंदाज आहे. त्या सर्वांचे समायोजन ज्या शाळांमध्ये पदे रिक्त आहेत तेथे होईल. शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्या शिक्षकांचे समायोजन करुन घेणे संबंधित शाळांसाठी बंधनकारक असणार आहे. ज्या शाळा अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणार नाहीत, त्या शाळेतील ती पदे रद्द केली जातील आणि त्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा पगार थांबविला जाणार आहे. समायोजनाची प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी म्हणून असा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे.
संचमान्यता अंतिम टप्प्यात आहे
बहुतेक शाळांची संचमान्यता अंतिम टप्प्यात आहे. शालेय शिक्षण विभागाकडून काही दिवसांत रिक्त, अतिरिक्त शिक्षकांची माहिती प्राप्त होईल. त्यानंतर अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध होईल. समुपदेशनानंतर त्यांचे समायोजन होईल. त्यानंतर शिक्षकांच्या बदलीचा टप्पा होईल आणि शेवटी रिक्त पदांची भरती होईल.
- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
अंतिम निर्णय कागदावर आलेला नाही
संचमान्यतेच्या नव्या निर्णयानुसार इयत्ता नववी व दहावीच्या वर्गात प्रत्येकी २० विद्यार्थ्यांचे बंधन आहे, अन्यथा तेथील शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. हा निकष बदलण्यासाठी शालेय शिक्षण मंत्र्यांनी बैठक घेतली, पण त्यावरील अंतिम निर्णय कागदावर आलेला नाही. त्यामुळे देखील संचमान्यता अंतिम होण्यास विलंब होत आहे.