राज्यातील २२ हजार रुग्ण साथीच्या रोगाने त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

राज्यात मलेरिया, डेंगी, स्वाइन फ्लू, चिकनगुनियाचे रुग्ण वाढले आहेत. साथीच्या रोगाचे निर्मूलन करण्यासाठी पाच दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार शाळा, गावांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.
- डॉ. प्रकाश भोई, सहसंचालक, आरोग्य, पुणे

सोलापूर - राज्यातील कोल्हापूर, पुणे, सातारा, नगर, यवतमाळ, सोलापूर, बीड, नाशिक या जिल्ह्यांमध्ये डेंगी, मलेरिया, स्वाइन फ्लू, चिकनगुनिया, जपानी ताप अशा साथीच्या रोगाने तब्बल २२ हजार रुग्ण त्रस्त आहेत. डेंगीने दहा हजार, तर स्वाइन फ्लूने चार हजार ३०० आणि मलेरियाने सहा हजार ३५० रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे. 

दुष्काळानंतरचा पाऊस, पूर आणि आताची अतिवृष्टी यामुळे राज्यातील बहुतांश पाण्याचे स्रोत अस्वच्छ झाले आहेत. सोलापूर, उस्मानाबादसह अनेक जिल्ह्यांमधील पाणीपुरवठा अद्याप सुरळीत झालेला नाही. त्यामुळे नागरिक घरात हजारो लिटर पाणी साठवून ठेवत असल्याने त्या पाण्यात डेंगीचे डास तयार होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिका व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने संबंधित नागरिकांना नोटीसही बजावली आहे. तरी डासांची उत्पत्ती कमी झालेली नाही. 

राज्यातील साथीच्या रोगनियंत्रणासाठी आरोग्य विभागाने पाच दिवसांचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार पहिल्या दिवशी शाळांमधील विद्यार्थ्यांना डासांची उत्पत्तीची माहिती देणे, दुसऱ्या दिवशी ग्रामसभा घेऊन नागरिकांना डासांची उत्पत्ती होणाऱ्या पाण्याची विल्हेवाट लावण्याची माहिती देणे, घरोघरी जाऊन साठवलेल्या पाण्याची विल्हेवाट लावणे, ग्रामपंचायतीद्वारे गटारी स्वच्छ करणे आणि शेवटच्या दिवशी कोरडा दिवस पाळणे असा कार्यक्रम राबविला जाणार आहे. कोरडा दिवस पाळण्यासाठी दुपारी पाणी सोडले जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 22000 of patients in the state suffer from epidemic in state