
राज्यात आदिवासींमध्ये २२.५ टक्के लोकांमध्ये सिकलसेल वाहक
पुणे - ‘महाराष्ट्रात विशेषतः आदिवासींमध्ये २२.५ टक्के लोकांमध्ये सिकलसेल वाहक आहेत, दीड टक्के लोकांना लागण झाली आहे. हा आनुवंशिक रोग आहे, याचे परिणाम गंभीर आहेत. सायप्रसमध्ये सरकारने रक्ताच्या कमीमुळे होणाऱ्या आनुवंशिक थॅलिसिमीया रोगाबाबत कार्य केले. सामाजिक इच्छाशक्ती असेल, तर भारतातही तसे करता येईल,’ असे मत बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुदाम काटे यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषद पुणे विभागातर्फे ‘सिकल सेल (कोयताकार पेशी) आणि त्यांचे आरोग्यावर होणारे परिणाम’ या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ. काटे बोलत होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या व्याख्यानावेळी परिषदेचे अध्यक्ष प्रा. राजेंद्रकुमार सराफ, प्रा. विनय आर. आर., संजीव अत्रे, डॉ. भोंडवे, अशोक सागर आदी उपस्थित होते.
डॉ. काटे म्हणाले, ‘मानवी रक्तात गोलाकार लाल रक्तपेशी शरीरभर ऑक्सिजन पुरवतात. काही स्त्री-पुरुषांमध्ये त्यात चंद्रकोरी किंवा कोयत्याच्या आकाराच्या असतात. त्यातून कमी ऑक्सिजन वाहून नेला जातो. त्यामुळे रुग्णाच्या शरीरातील मेंदू, डोळा, हृदय, गर्भाशय अशा अवयवांच्या कार्यात बिघाड होतो. त्यामुळे रक्ताची तपासणी आवश्यक असते. सिकल सेलवर त्रास कमी करणारे औषधोपचार आहेत. पण ते खर्चिक आहेत.’ माजी प्राचार्य असलेल्या डॉ. काटे यांनी गेली ५० वर्षे सिकल सेल क्षेत्रात काम केले आहे. ८९ वर्षांचे काटे अजूनही कार्यरत आहेत. अंजली साठे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. राजेंद्रकुमार सराफ यांनी आभार मानले.
Web Title: 225 Percent Of Tribals In The State Are Sickle Cell Patient Carriers
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..