अवघा २५ टक्के पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

२५ जिल्ह्यांत कमी पाणीसाठा  
राज्यातील मुंबई शहर आणि मुंबई उपनगर वगळता उर्वरित ३४ जिल्ह्यांपैकी २५ जिल्ह्यांचा उपयुक्त पाणीसाठा ३० टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. तर ८ जिल्ह्यांमध्ये ३० ते ७५ टक्के, तर पालघर या एकाच जिल्ह्यामध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक उपयुक्त पाणीसाठा असल्याचे राज्याच्या जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले.

धरणांमध्ये ३५६.५० टीएमसी पाणी; गतवर्षीच्या तुलनेत निम्मा साठा
पुणे - जुलै महिना संपत आला, तरीही पावसाने पुरेशी हजेरी न लावल्याने राज्यातील पाणीसाठ्याची स्थिती गंभीर झाली आहे. आज राज्यातील मोठे, मध्यम आणि लघू अशा सर्व ३२६७ प्रकल्पांमध्ये ३५६.५० टीएमसी (२५ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी याच तारखेला सर्व प्रकल्पांमध्ये सुमारे ४६ टक्के पाणी उपलब्ध होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निम्मा पाणीसाठा झाला आहे. विदर्भ, मराठवाड्यात स्थिती चिंताजनक असून कोकण, मध्य महाराष्ट्रात धरणांचा पाणीसाठा वाढत असला तरी अद्याप पुरेसा साठा झालेला नाही.

विभागनिहाय पाणीसाठ्याचा विचार करता यंदा मराठवाड्यात अवघा १ टक्के आणि पूर्व विदर्भातील नागपूर विभागात ८ टक्के, तर पश्चिम विदर्भातील अमरावती विभागात ९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागात २० टक्के, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक विभागात २० टक्के आणि कोकण विभागात ६७ टक्के पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालावरून दिसून येते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील धरणांचा पाणीसाठा २१ टक्क्यांनी कमी आहे. गेली काही वर्षे सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यात धरणांच्या पाणलोटात यंदाही पावसाने ओढ दिल्याने जायकवाडीसह माजलगाव, येलदरी, सीना कोळेगाव, निम्न दुधना ही धरणे अचल पाणीसाठ्यात गेली आहेत.  यंदा त्यातुलनेत खूपच कमी पाणीसाठा असल्याने पुढील काळात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.  

जोर वाढण्याची शक्यता 
राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाने उघडीप दिली आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकण्याचे संकेत असल्याने गुरुवारपासून (ता. २५) राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. आज (ता. २३) कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

सोमवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारपासून (ता. २५) कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 25 Percentage Water Storage in Dam Rain