दहावी-बारावी परीक्षेला एका वर्गात २५ विद्यार्थी! १०० टक्के अभ्यासक्रमावर प्रश्नपत्रिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Exam
दहावी-बारावी परीक्षेला एका वर्गात २५ विद्यार्थी! १०० टक्के अभ्यासक्रमावर प्रश्नपत्रिका

दहावी-बारावी परीक्षेला एका वर्गात २५ विद्यार्थी! १०० टक्के अभ्यासक्रमावर प्रश्नपत्रिका

सोलापूर : दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित झाले असून बारावाची परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा २ मार्चपासून सुरु होणार आहे. राज्यभरातील आठ हजार केंद्रांवर बोर्डाची परीक्षा पार पडेल. एका वर्गात २५ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था राहील, असे पुणे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सर्वप्रथम सुरू होणार आहे. १ ते २० फेब्रुवारी दरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा पार पडेल. त्यानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा सुरु होईल. तत्पूर्वी, १० फेब्रुवारीपासून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक सुरु होईल. १ मार्च रोजी त्यांची प्रात्यक्षिक संपल्यानंतर दहावीची लेखी परीक्षा सुरु होणार आहे. सध्या कोरोनाची भीती कमी झाल्याने आता शाळा तेथे केंद्र नव्हे तर पूर्वीप्रमाणेच राज्यातील आठ हजार केंद्रावर परीक्षा होईल, असे बोर्डाचे सचिव अनुराधा ओक यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले आहे. जवळपास ३० लाख विद्यार्थी परीक्षा देतील. कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथके नेमली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी पूर्वतयारी करून तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन पण त्यांनी केले आहे.

१०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा

कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत ‘शाळा तेथे केंद्र’ ही संकल्पना पुढे आली. त्यानुसार परीक्षा घेण्यात आली. त्यावेळी एका वर्गात कमी विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था होती. अभ्यासक्रमात २५ टक्के कपात केली होती. आता एका वर्गात २५ विद्यार्थी परीक्षा देतील. कोरोनापूर्वी ज्या केंद्रांवर परीक्षा होत होती, तेथेच केंद्रे असतील. तसेच आगामी परीक्षेला १०० टक्के अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न असतील, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.

प्रश्नपत्रिकांचा सराव अन्‌ नोट्‌स काढा

दहावी व बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून यशस्वी होण्यासाठी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव करणे आवश्यक आहे. तसेच वर्णनात्मक प्रश्न सोपे जातील, यासाठी स्वत:हून नोट्‌स काढायला हवेत. अभ्यासाचे वेळापत्रक तयार करावे, सकाळी लवकर उठून अभ्यास करावा. परीक्षा काळात मोबाइल दूर ठेवावा. परीक्षेचा कोणताही ताण न घेता विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अभ्यास करून परीक्षा दिल्यास निश्चितपणे यश मिळेल, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.