
तात्या लांडगे
सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अत्याचार पीडितांसह गर्भात व्यंगत्व असलेल्या व अन्य महिलांना २४ आठवड्यापर्यंत गर्भपातास परवानगी दिली जाते. मागील चार वर्षांत सोलापूर जिल्ह्यातील तब्बल २५ महिला, अल्पवयीन मुलींसह एका गतिमंद महिलेचा गर्भपात करण्यात आला आहे. त्या निराधार, निराश्रित महिला, अल्पवयीन मुलींना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची मोठी मदत झाली आहे.
कुटुंबात तीन मुली, दोन मुले आणि पती मद्यपी, यामुळे कुटुंब सांभाळणाऱ्या आईने १४ वर्षांच्या मुलीला स्वत:च्या बहिणीकडे धाराशिव येथे पाठविले. बहिणीलाही कामात मदत होईल आणि मुलीलाही खायला पोटभर अन्न मिळेल, शिक्षणाची सोय होईल हा त्यामागील हेतू होता. एक, दोन, तीन-पाच महिने झाले सर्वकाही ठीक सुरू होते. ११ महिन्यांनी मुलगी अचानक घरी परतली. हताश, निराश दिसणारी मुलगी सतत पोटात दुखत असल्याचे सांगत होती.
पोटही वाढल्यासारखे दिसत होते. बहिणीला फोन करून विचारले तर ती देखील काही सांगत नव्हती. शेवटी त्या अल्पवयीन मुलीच्या आईने तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेले. त्यावेळी ती अल्पवयीन मुलगी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पीडितेच्या आईने विश्वासात घेऊन तिला विचारले आणि आईलाही मोठा धक्का बसला. त्या पीडितेच्या काकानेच तिच्यावर अत्याचार केले होते. त्या काकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल होऊन त्याला शिक्षा झाली. दुसरीकडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मदतीने पीडितेचा गर्भपात करण्यात आला.
गर्भपाताची अशी आहे प्रक्रिया...
सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे कायदेशीर मदतीसाठी आलेल्या पीडितांकडून अर्ज भरून संपूर्ण माहिती घेतली जाते. त्यांच्याकडील कागदपत्रे महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाला पाठविली जातात. त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या अर्जांचा अभ्यास करून मेडिकल बोर्डाचाही रिपोर्ट पाहिला जातो. त्यानंतर उच्च न्यायालयात गर्भपातासाठी परवानगी मागितली जाते. न्यायालयाच्या परवानगीने पीडितेचा गर्भपात केला जातो.
गर्भपात झालेल्यांमध्ये...
१९ महिला विवाहित असून, त्यातील काहींच्या गर्भात व्यंगत्व होते. काही अत्याचार पीडिता आहेत.
५ अविवाहित तथा अल्पवयीन मुली असून, सर्वजणी अत्याचार पीडिता आहेत.
१ गतिमंद महिला असून तिच्यावर अत्याचार झाला होता.
वर्षनिहाय गर्भपात
वर्ष गर्भपात
२०२१ ०४
२०२२ १०
२०२३ १०
२०२४ ०१
एकूण २५
निराधार, निराश्रित पीडित महिलांना प्राधिकरणाची मोठी मदत
सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मनोज शर्मा, सचिव मल्हार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पीडितांसह अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. खास करून अत्याचार पीडित महिला- मुलींना प्राधिकरणाची मोठी मदत झाली आहे.
- डॉ. देवयानी किणगी, सहायक लोकअभिरक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर