शहीद तुकाराम ओबळेंच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी; ठाकरे सरकार 10 कोटी देणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tukaram Omble

आमदार शिवेंद्रराजेंनी तुकाराम ओंबळेंचे यथोचित स्मारक व्हावे, यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता.

शहीद ओबळेंच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी; ठाकरे सरकार 10 कोटी देणार?

sakal_logo
By
संदीप गाडवे

26/11 Mumbai Attack केळघर (सातारा) : आंतरराष्ट्रीय दहशतवादी अजमल कसाबला (Terrorist Ajmal Kasab) जिवंत पकडत असताना आपल्या जिवाची पर्वा न करता हौतात्म्य स्वीकारणाऱ्या जावलीतील केडंबे गावाचे सुपुत्र तुकाराम ओंबळे (Tukaram Omble) यांच्या जन्मगावी उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या एक हेक्टर जागेचा प्रश्न महसूल विभागाकडून मार्गी लागला आहे. जावलीतील केडंबे येथे हुतात्मा तुकाराम ओंबळे स्मारकाच्या (Tukaram Omble Memorial) एक हेक्टर जागेचा सात बारा जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने झाला असून जागेचा प्रश्न मार्गी लागला असल्याने आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून 10 कोटी रुपयांचा निधी सातारा मतदारसंघाचा लोकप्रतिनीधी म्हणून लवकरात-लवकर मिळवून स्मारक उभारणीचे काम लवकरच सुरु होणार असल्याची महत्वपूर्ण माहिती आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosle) यांनी 'ई-सकाळ'शी बोलताना दिली.

शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, आमदार म्हणून तुकाराम ओंबळे यांचे यथोचित स्मारक व्हावे, म्हणून राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अजित पवार यांच्याकडे स्मारकाच्या बाबतीत पाठपुरावा केला आहे. अजित पवार यांनी हुतात्मा तुकाराम ओंबळे स्मारकाकरिता निधी उपलब्ध केला. मात्र, महसूल विभागाकडून जागेच्या बाबतीत झालेल्या दिरंगाईमुळे स्मारक बांधकामास उशीर झाला. परंतु, जावळीतील केडंबे या त्यांच्या जन्मगावी उभारण्यात येणाऱ्या स्मारकाशेजारी विद्यार्थ्यांकरिता सुसज्ज अशी अभ्यासिका उभारण्यात यावी, त्यामुळं स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल. महाराष्ट्र शासनाकडे १० कोटी रुपयांची मागणी करणार असून अजित पवार हे हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाकरिता 10 कोटी रुपयांचा निधी नक्कीच देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: कसाबला जिवंत पकडून ओंबळेंनी पाकिस्तानचा चेहरा जगासमोर आणला होता

दरम्यान, जावली तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी सांगितलं की, हुतात्मा ओबळे यांच्या केडंबे या जन्मगावी गट नंबर १५९ मधील १ हेक्टर क्षेत्र ओबळेंच्या स्मारकाकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तांतरीत करण्याचे काम पूर्ण केले आहे. ओबळेंच्या जन्मगावी रखडलेला स्मारकाच्या जागेचा प्रश्न आमदार भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर मार्गी लागला आहे. जागेच्या प्रश्नानंतर जावळीच्या या सुपुत्राचे स्मारक त्यांच्या जन्मगावी उभारुन येणाऱ्या पिढ्यांना त्यांनी पत्करलेल्या हुतात्म्यातून अखंड उर्जेचा स्रोत सदैव तेवत रहावा, अशी मागणी सर्व स्तरातून व्यक्त होताना दिसत आहे. तुकाराम ओंबळेंचे स्मारक युवापिढीसमोर दीपस्तंभ ठरावे, यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वासही आमदार भोसलेंनी शेवटी व्यक्त केला.

हेही वाचा: कोळसा खाणीत भीषण स्फोट; आगीत 52 कामगारांचा होरपळून मृत्यू

loading image
go to top