राज्यात या वेळी 28 लाख 53 हजार नवीन मतदार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 25 जानेवारी 2019

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून निवडल्या जाणाऱ्या 48 खासदारांचे भवितव्य नवीन मतदारांच्या हाती असेल, राज्यात आजपर्यंत तब्बल 28 लाख 53 हजार 241 नवीन मतदारांनी या वेळी मतदानासाठी नाव नोंदणी केल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली.

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून निवडल्या जाणाऱ्या 48 खासदारांचे भवितव्य नवीन मतदारांच्या हाती असेल, राज्यात आजपर्यंत तब्बल 28 लाख 53 हजार 241 नवीन मतदारांनी या वेळी मतदानासाठी नाव नोंदणी केल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली.

25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा होतो. 17 व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मतदार नोंदणीची मोहीम पार पडली. त्यामध्ये राज्यातील 35 जिल्ह्यांत 28 लाख 53 हजार 241 नवमतदारांनी पहिल्यांदाच मतदान यादीत नाव नोंदवले आहे.

पुणे, मुंबई, ठाणे या मेट्रो शहरात नवमतदारांची संख्या अधिक आहे. मुंबईत (2 लाख 85 हजार), ठाणे (2 लाख 99 हजार), पुणे (2 लाख 2 हजार), औरंगाबाद (1 लाख 62 हजार), नाशिक (2 लाख 98 हजार), जळगाव (1 लाख 38 हजार), नांदेड (1 लाख 14 हजार), यवतमाळ (1 लाख 92 हजार), सोलापूर (1 लाख 34 हजार), नागपूर ( 1 लाख 65 हजार), अमरावती ( 85 हजार), कोल्हापूर ( 1 लाख 28 हजार) जिल्ह्यातील तरुण मतदारांनी आपले नाव नोंदवले आहे.

या वेळी राज्यात ज्या नवमतदारांनी नाव नोंदणी केली आहे, त्यात महिलांची संख्या अधिक आहे. 17 लाख 53 हजार पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या 18 लाख 34 हजार इतकी आहे.

तरुण मतदारांबरोच तृतीय पंथीय मतदारही मतदानासाठी पुढे येत असल्याचे दिसते. राज्यातून या वेळी 203 तृतीयपंथीयांनी यादीत नाव नोंदवले आहे. त्यात नांदेड 12, औरंगाबाद 14, पुणे 20, ठाणे 26, कोल्हापूर 19 आणि सांगली जिल्ह्यामधून 18 तृतीयपंथीयांनी मतदान यादीत नाव नोंदवल्याचे दिसते.

मतदान केंद्रे वाढणार
गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात 95 हजार मतदान केंद्रे होती. मतदारांची संख्या वाढल्याने या वेळी केंद्राची संख्या 1 लाख 3 हजार इतकी असणार आहे. राज्यात 2 लाख 24 हजार दिव्यांग मतदार आहेत. त्यांना मतदान केंद्रावर विविध सोई उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2853000 new voter in state