तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर शहरातील नागरिकांची सुरक्षा, गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून शहरातील प्रमुख चौकांमध्ये ३३१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वाहतूक नियमनासाठी नवे १० स्मार्ट सिग्नलही बसविण्यात आले. मात्र, हे सर्व सीसीटीव्ही आणि नवे सिग्नल स्ट्रीट लाईटच्या कनेक्शनला (मीटर) जोडण्यात आले आहेत. ‘महावितरण’कडून दिवसा स्ट्रीट लाईट बंद केली जात असल्याने सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत शहरातील सीसीटीव्ही आणि सिग्नल बंद राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतून शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, चार हुतात्मा पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सात रस्ता, हरिभाई देवकरण प्रशाला अशा महत्त्वाच्या ठिकाणी ३३१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शहरातील चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंग, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, भीषण अपघात अशा गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांना या कॅमेऱ्यांची नेहमीच मदत होते.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करून मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, रिक्षाच्या चालकाच्या सीटवर प्रवाशांची वाहतूक करणे, ट्रिपल सीट दुचाकी चालविणे अशा प्रकारांवरही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांना स्वयंशिस्त लागण्यातही कॅमेऱ्यांचा मोठा वाटा आहे. मात्र, ‘महावितरण’चे नवे धोरण आणि महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सध्या वाहतूक पोलिसांना शहरातील नवे स्मार्ट सिग्नलही बंद ठेवावे लागत आहेत.
‘त्या’ चोरट्याच्या शोधासाठी जोडभावी पेठ पोलिसांची दमछाक
सोलापूर शहरातील भुसार पेठेतील मानिकस्वामी मंदिरात दर्शनासाठी निघालेल्या ६१ वर्षीय शोभा राजकुमार कळसकर यांचे दागिने एका दुचाकीस्वाराने लंपास केले. जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तो शहरात कोठून आला आणि कोणत्या मार्गाने पसार झाला, याचा शोध सुरू केला. त्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आधार घेण्याचे ठरविले. मात्र, ‘स्मार्ट सिटी’तून बसविण्यात आलेले कॅमेरे बंद असल्याने पोलिसांना खासगी कॅमेऱ्यांची मदत घ्यावी लागली.
सोलापुरातील ‘सीसीटीव्ही’ची सद्यःस्थिती
‘स्मार्ट सिटी’चे सीसीटीव्ही
३३१
दिवसा बंद कॅमेरे
३३१
रात्री बंद असणारे कॅमेरे
अंदाजे १७५
खासगी सीसीटीव्ही कॅमेरे
अंदाजे २,२००
नेमकी अडचण काय?
‘महावितरण’ने ऑटो प्रोग्रॅमिंग लावल्याने सोलापूर शहरातील स्ट्रीट लाईट दिवसा सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत आपोआप बंद होतात. दिवसा स्ट्रीट लाईट बंद करण्याची सोय महापालिकेकडे नाही. त्यात स्ट्रीट लाईटला स्मार्ट मीटर बसविण्यात आले असून त्यावर सीसीटीव्ही आणि नव्या सिग्नलचे कनेक्शन जोडण्यात आले आहे. त्यामुळे सीसीटीव्ही आणि सिग्नल बंद ठेवावे लागत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे, काही मीटरचे वीजबिलही महापालिकेने भरलेले नाही. सीसीटीव्हीच्या संदर्भात महापालिकेने ‘महावितरण’कडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नसल्याने सद्यःस्थिती ‘जैसे थे’च आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.