onion
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : अतिवृष्टी व महापुराचा फटका सहन केलेल्या शेतकऱ्यांच्या कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याची बाजारातील स्थिती आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत २९ डिसेंबर ते ७ जानेवारीपर्यंत तब्बल पाच हजार ट्रक कांदा विक्रीसाठी आला. आवक वाढल्याने ३२०० रुपयांपर्यंत गेलेला उच्चांकी भाव आता २३०० रुपयांपर्यंत खाली आला आहे.
यंदाच्या हंगामातील सर्वाधिक आवक २ आणि ३ जानेवारीला आली होती. २ जानेवारीला ६७६ तर ३ जानेवारीला सोलापूर बाजार समितीत ७६२ ट्रक कांदा विक्रीसाठी आला होता. २९ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांना किमान भाव प्रतिक्विंटल १३०० आणि उच्चांकी भाव ३२०० रुपये मिळाला होता. पण, आता तो भाव एक हजार ते २३०० रुपये प्रतिक्विंटल असा मिळत आहे. दरम्यान, कांद्याची रिकामी पिशवी तथा बारदाना ३० ते ४० रुपयाला मिळत असून कांदा चिरायला प्रतिपिशवी १५० रुपये आणि गाडीभाडे ३० रुपये पिशवी द्यावे लागत आहे.
कांदा काढणीसाठी ३०० रुपये मजुरी द्यावी लागते. कांदा लागवडीसाठी जमिनीची मशागत, बियाणे, लागवड, खते आणि खुरपणीसाठी देखील मोठा खर्च आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्विंटल किमान दोन हजार रुपयांचा भाव अपेक्षित आहे. पण, तेवढा भाव मिळत नाही. दुसरीकडे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना लगेचच रोख पैसे मिळत नाहीत. १५ दिवसांच्या मुदतीचा धनादेश दिला जातो. त्यामुळे सध्या बळिराजाच्या डोळ्यात सध्या अश्रू पाहायला मिळत आहेत.
तीन दिवस बंद राहणार लिलाव?
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त १३ ते १५ जानेवारीपर्यंत लिलाव बंद राहण्याची शक्यता आहे. १३ जानेवारीला अक्षता सोहळा, १४ जानेवारीला मकर संक्रात आणि १५ जानेवारीला महापालिकेसाठी मतदान होणार आहे. पण, बाजार समितीतील व्यापाऱ्यांची शुक्रवारी (ता. ८) बैठक होणार असून त्यात नेमके किती दिवस लिलाव बंद राहणार याचा निर्णय होणार आहे. तूर्तास, शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून नये, असे आवाहन व्यापाऱ्यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.