मराठवाड्यात 25 दिवसांत 71 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जून 2019

दुष्काळामुळे मराठवाड्यात मे महिन्यातील 25 दिवसांत 71 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. यात एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील 41 दुष्काळ पीडित शेतकऱ्यांचा समावेश आहे. 

औरंगाबाद : दुष्काळामुळे मराठवाड्यात मे महिन्यातील 25 दिवसांत 71 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. यात एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील 41 दुष्काळ पीडित शेतकऱ्यांचा समावेश आहे. 

शेतकरी आत्महत्या थांबण्याऐवजी वाढत असल्याचे विदारक वास्तव समोर येत आहे. या वर्षात जानेवारीपासून आतापर्यंत शेतकरी आत्महत्येचा आकडा 326 वर पोचला आहे. सततची नापिकी, शेती पिकवत असताना होणारे नुकसान, कर्जमाफीचा गोंधळ तसेच सावकारीपाशात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. मागील वर्षी कपाशीवरील शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव आणि गारपिटीमुळे हातचे पीक गेले होते.

शिवाय दुसऱ्या वर्षी पुन्हा दुष्काळाचे संकट समोर उभे राहिले. औरंगाबाद, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत तुलनेत कमी पाऊस झाला असून, या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्या करीत आहेत. 

शेतीचे उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांना दैनंदिन गरजा भागविणेही कठीण झाले आहे. अनेक शेतकरी पोट भरण्यासाठी स्थलांतर करीत आहेत. यंदा मे महिन्यात 71 शेतकऱ्यांनी जीवन संपविले. यंदा झालेल्या 326 आत्महत्यांपैकी 214 आत्महत्या पात्र ठरवण्यात आल्या; तर 69 अपात्र ठरवल्या. तसेच, 43 प्रकरणे अद्यापही चौकशीसाठी प्रलंबित आहेत. 

प्रशासन कुठे आहे? 

शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी प्रशासनाकडून काय प्रयत्न सुरू आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर कुठल्याही राजकीय पक्षाने फारसे पोटतिडकीने मत मांडलेले बघायला मिळाले नाही. जो सर्वांसाठी अन्नधान्यांची निर्मिती करतो, नेमके त्याच्याकडेच प्रशासन, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष होत असल्यानेच आत्महत्येसारखे पाऊल उचलले जात असल्याचे शेतकरी कुटुंबातील अनेक जण बोलून दाखवत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 71 farmers suicides in Marathwada 25 days