‘सिबिल’ची अट! ‘रब्बी’ कर्जासाठी ७२००० शेतकऱ्यांचे हेलपाटे; १९ बॅंकांचे ४० टक्के सुद्धा कर्जवाटप नाही

सिबिल खराब असल्याचे सांगून बॅंकांनी शेतकऱ्यांना कर्ज नाकारले. रब्बी हंगामात जिल्ह्यातील ७२,४८० शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारल्याची माहिती समोर आली आहे.
crop loan
crop loanesakal

सोलापूर : अतिवृष्टीचा सामना केल्यानंतर रब्बी पिकांमधून समाधानकारक उत्पन्न येईल, या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी बॅंकांकडे पीक कर्जाची मागणी केली. पण, सिबिल खराब असल्याचे सांगून बॅंकांनी शेतकऱ्यांना कर्ज नाकारले. रब्बी हंगामात जिल्ह्यातील ७२ हजार ४८० शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने २०२२-२३ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील एक लाख ५३ हजार ५९१ शेतकऱ्यांना रब्बी हंगामात एक हजार ६६३ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. १ ऑक्टोबर ते ३१ मार्च या कालावधीत उद्दिष्टानुसार १०० टक्के कर्जवाटप होणे अपेक्षित आहे.

मात्र, ३१ बॅंकांपैकी ११ बॅंकांचे कर्जवाटप ४० टक्क्यांपेक्षाही कमी असून आठ बॅंकांनी तर एकाही शेतकऱ्याला कर्ज दिलेले नाही. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सातत्याने त्यासंदर्भात बैठका घेऊनही त्या बॅंकांनी उद्दिष्टानुसार कर्जवाटप केले नाही, हे विशेष. अतिवृष्टी, अवकाळी, महापूर अशा नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.

शेतकऱ्यांना खासगी सावकारांच्या दारात कर्जासाठी जायला लागू नये म्हणून सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी स्वतंत्र आदेश काढून बॅंकांना पीक कर्जासाठी ‘सिबिल’चे बंधन न घालण्याचे आवाहन केले. मात्र, बॅंकांनी सहकार आयुक्तांचे आदेश गुंडाळून ठेवत ‘सिबिल’ची अट कायम ठेवल्याची वस्तुस्थिती आहे. दिलासादायक बाब म्हणजे रब्बी कर्जवाटपात जिल्हा मध्यवर्ती बॅंक अव्वल असून बॅंकेने उद्दिष्टापेक्षा (१४५ टक्के) जास्त कर्जवाटप केले आहे.

आठ बॅंकांकडून कर्जवाटपच नाही

डेव्हलपमेंट क्रेडिट बॅंक, फेडरल बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक, एयु फायनान्स, इक्विटस बॅंक, जनलक्ष्मी बॅंक, सुर्योदय बॅंक व उज्जीवन बॅंक, यांना रब्बी हंगामात नऊ हजार ६४४ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले होते. परंतु, त्यापैकी कोणत्याच बॅंकेने उद्दिष्टानुसार एकाही शेतकऱ्यास कर्जवाटप केलेले नाही. दुसरीकडे ११ बॅंकांचे कर्जवाटप ४० टक्केसुद्धा झालेले नाही. विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेचेही कर्जवाटप ६१ टक्क्यावरच आहे. दुसरीकडे जिल्हा बॅंकेसह बॅंक ऑफ बडोदा, बॅंक ऑफ इंडिया, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, आयडीएफसी बॅंक कर्जवाटपात अव्वल आहेत.

रब्बी कर्जवाटपाची सद्यस्थिती

  • शेतकऱ्यांचे उद्दिष्ट

  • १,५३,५९१

  • कर्जवाटपाचे टार्गेट

  • १,६६३.०३ कोटी

  • कर्ज न मिळालेले शेतकरी

  • ७२,४८०

  • एकूण कर्जवाटप

  • १,१२८ कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com