

pregnent women
sakal
सोलापूर : केवळ मोठ्याने वाजणाऱ्या साउंडचा आवाज कमी करण्यास सांगितल्याच्या कारणावरून एका तरुणाने १९ वर्षीय, नऊ महिन्यांच्या गर्भवतीचे डोके भिंतीवर आपटून तिचा खून केल्याची घटना सोलापूर शहरात घडली आहे. सोनी गणेश रामपुरे (वय १९, रा. अलकुंटे परिसर, सोलापूर) असे त्या गर्भवतीचे नाव आहे. या घटनेत सोनीच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला आहे.
सोनी म्हेत्रे या तरुणीचा एका वर्षापूर्वी गणेश रामपुरे याच्याशी विवाह झाला होता. सध्या ती नऊ महिन्यांची गरोदर होती. रविवारी (ता. १९) घरासमोर राहणारा बापू सुरेश आरगोळ (वय २६) हा घराबाहेर मोठ्या आवाजात साउंड सिस्टीम लावून लहान मुलांसोबत नाचत होता. घरासमोरच त्याचा गोंधळ सुरू होता. सोनीची आई लक्ष्मी राम म्हेत्रे यांनी ‘माझी मुलगी नऊ महिन्यांची गरोदर आहे, कृपया साउंड बंद कर, गोंधळ थांबवा,’ असे बापूला सांगितले होते. सोनी हिनेही त्याच्याकडे आवाज कमी करण्याची विनंती केली होती. त्यावेळी संशयित आरोपीने सोनीचे डोके भिंतीवर जोरात आपटले.
यात सोनी जागीच बेशुद्ध पडली आणि दवाखान्यात नेईपर्यंत तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी सोनीची आई लक्ष्मी म्हेत्रे यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून बापू आरगोळ याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत घराजवळ लपून बसलेल्या बापूला अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली असून, सहायक पोलिस निरीक्षक गजानन पाटील तपास करीत आहेत.
सोनीचे लग्न आपल्यासोबत न झाल्याचा होता राग
संशयित आरोपी बापू आरगोळ या तरुणाला सोनी हिच्यासोबत विवाह करायचा होता. परंतु, बापूला दारूचे व्यसन होते आणि तो कोणताही कामधंदा करत नव्हता. त्यामुळे सोनीच्या कुटुंबीयांनी तिचा विवाह दुसऱ्या तरुणासोबत लावून दिला होता. या रागातून तो सतत त्यांच्याशी भांडण करत होता. सोनी ही आपल्या पतीसोबत आईच्या घरी राहात होती. रविवारी साउंडचा आवाज कमी करण्यास सांगितल्याच्या रागातून त्याने गर्भवती सोनीचा खून केल्याचे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले. यात बेशुद्ध पडलेल्या सोनीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच सोनी व तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.