१० बाय ५ फूटाची खोलीत पाच जणांचा संसार! रात्री गाढ झोपेत असताना लिकेज झाला गॅस सिलिंडर अन्... सोलापूर शहरातील घटना
तात्या लांडगे
सोलापूर : पाच फूट रूंद आणि दहा फूट लांबीच्या छोट्याशा खोलीत सिलिंडरमधील गॅस लिकेज झाला. घराला खिडकी नाही, दरवाजाही पॅकबंद असल्याने तो गॅस शरीरात गेल्याने घरातील पाचजण बेशुद्ध पडले. त्यातील हर्ष व चिमुकली अक्षता या दोघांचा मृत्यू झाला असून तिची आजी विमल यांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रविवारी (ता. ३१) सोलापूर शहरातील नळ बझार चौक परिसरात घडली आहे.
नळ बझार चौकाजवळील राज बलराम वाले (वय ३३) हे शनिवारी तिरूपती बालाजीचे दर्शन घेऊन घरी परतले होते. त्यांची आई विमल मोहनसिंग बलरामवाले (वय ५२), पत्नी रंजना बलरामवाले (वय २५), मुलगा हर्ष (वय ५) व मुलगी (वय ७) हे सगळेजण रात्री जेवण करून झोपी गेले. झोपताना गॅस सिलिंडरचा बर्नर चुकून सुरूच राहिला होता. सगळेजण गाढ झोपेत असल्याने हळू हळू घरात पसरणाऱ्या गॅसचा त्यांना वास आला नाही. संपूर्ण घरात गॅस पसरला होता आणि त्यातच सगळेजण बेशुद्ध पडले होते.
रविवारी (ता. ३१) सकाळी साडेअकरा वाजल्यानंतरही घरातून कोणीच बाहेर कसे काय आले नाही म्हणून कोणीतरी घराचा दरवाजा ठोठावला. पण, आतून काहीही आवाज येत नव्हता. एक व्यक्ती घरावर चढला आणि त्याने पत्रा उचकटून पाहिले. त्यावेळी घरातील सगळेजण निपचित पडल्याचे दिसले. वाले यांच्या घराजवळ मोठी गर्दी जमली होती. सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. बंडगर त्याठिकाणी पोचले. सर्वांनी मिळून घर उघडले आणि त्यांना सिव्हिल रुग्णालयात हलविले. त्यातील हर्षतराज व चिमुकली अक्षता याचा मृत्यू झाला असून तिची आजी विमल, चिमुकल्यांची आई रंजना, वडील युवराज बलरामवाले यांची यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर ‘आयसीयू’त उपचार सुरू आहेत.
घराची रचना अन् जागा जीवघेणी
नळ बझार परिसरातील बलरामवाले कुटुबियांच्या घराची लांबीला दहा फूट आणि रुंदी पाच फूट, त्या घरातच किचन होते. घराचे छत तथा पत्रे अवघ्या आठ फुटावर आहेत. तेवढ्या छोट्या खोलीत दररोज कुटुंबातील पाचजण झोपायचे. घराला एक दरवाजा, तोही एकदम पॅकबंद आहे. घराला कोणतीही खिडकी नाही, अशी त्या घराची रचना आहे. छोटे घर, घरातील रचना, सदस्य संख्या पाहून पोलिसही चक्रावले.
प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना
रस्त्यालगत असलेल्या बलरामवाले यांचे घर बाहेरून नव्हे आतून बंद कसे काय म्हणून गल्लीतील एकाने दरवाजा ठोठावला. एकजण घरावर चढला आणि पत्रा उचकटला. त्यानंतर घरातील सगळेच बेशुद्ध पडल्याचे पाहून त्या व्यक्तीने आत उडी मारून कडी उघडली. त्यानंतर तातडीने सर्वांना रुग्णालयात दाखल केले. लोकांनी प्रसंगावधान दाखविल्याने मोठी दुर्घटना टळली, असे सहायक पोलिस आयुक्त सुधीर खिरडकर म्हणाले. तरीपण, दोन चिमुकल्यांचा संघर्ष रात्री साडेनऊ वाजता संपला, त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. उर्वरित तिघांवर उपचार सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.