एक हजारात मद्यपानाचा लाईफटाईम परवाना! धाब्यावर दारू पिणाऱ्या ६ जणांना ३०००० दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

alcohol
एक हजारात मद्यपानाचा लाईफटाईम परवाना! धाब्यावर दारू पिणाऱ्या ६ जणांना ३०००० दंड

एक हजारात मद्यपानाचा लाईफटाईम परवाना! धाब्यावर दारू पिणाऱ्या ६ जणांना ३०००० दंड

सोलापूर : बार्शी शहर परिसरातील धाब्यांवर बसून मद्यपान करणाऱ्या सहा मद्यपींवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. तर हॉटेल सांज व हॉटेल राजमुद्रावर गुन्हा दाखल केला. न्यायालयाने दोन्ही हॉटेल चालकांना प्रत्येकी २५ हजारांचा तर प्रत्येक मद्यपीला पाच हजारांचा दंड ठोठावला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी बार्शी शहर परिसरातील हॉटेलवर छापा टाकला. त्या हॉटेलमध्ये अवैधरीत्या दारू पिण्याकरिता बसलेल्या सहा मद्यपींना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६८ व कलम ८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेतील संशयित आरोपींच्या ताब्यातून दोन हजार २८० रुपयांची दारू व काचेचे ग्लास असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संभाजी फडतरे, सदानंद मस्करे, भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कदम, दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे, अंकुश आवताडे, पुष्पराज देशमुख, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश होळकर, बिराजदार व जवान नंदकुमार वेळापुरे, मलंग तांबोळी, महिला जवान प्रियांका कुटे, वाहन चालक रशीद शेख, मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली. अनिल पांढरे व प्रकाश सावंत यांनी फिर्याद दिली होती. दुय्यम निरीक्षक गणेश उंडे व सुरेश पाटील यांनी तपास पूर्ण केला होता. तपास अधिकाऱ्यांनी एका दिवसात गुन्ह्याचे आरोपपत्र आज (शुक्रवारी) न्यायालयात दाखल करून सर्वांना बार्शी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तत्काळ निकाल देत हॉटेल चालक व मद्यपींना दंडाची शिक्षा ठोठावली. दरम्यान, दिवाळी सणात अवैधरीत्या दारू विक्री, वाहतूक व मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष पथके नेमली आहेत.

शंभर रुपयांत मिळतो मद्यपानाचा परवाना

मुंबई विदेशी मद्य नियमांतर्गत मद्यपान करणाऱ्यांकडे त्यासंबंधीचा परवाना असायलाच हवा. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे ऑनलाइन अर्ज केल्यास १०० रुपयांचे शुल्क भरून एक वर्षाचा आणि एक हजारांचे शुल्क भरून आयुष्यभराचा परवाना मिळतो. वाईन शॉपमधून दारू खरेदी करताना संबंधित व्यक्तीकडे मद्यपानाचा परवाना बंधनकारक आहे. परमीट रूमशिवाय अन्य ठिकाणी मद्यपान करणे गुन्हा आहे. दारू पिणाऱ्यांकडे त्यासंबंधीचा परवाना असायलाच हवा, अशी माहिती अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली.