
Jitendra Awhad : ठाण्यात शिंदे गट विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांच्यात नवा संघर्ष सुरू
ठाण्यामध्ये शिंदे गट विरुद्ध जितेंद्र आव्हाड असा नवा संघर्ष निर्माण झाला आहे. खारेगाव उड्डाण पुलावर असणारा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नावाचा बोर्ड पालिकेकडून हटवण्यात आला आहे. हा बोर्ड शिंदे गटाच्या दबावामुळे हटवण्यात आला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
कळवा-मुंब्रा मतदार संघाचे जितेंद्र आव्हाड आमदार आहेत. ठाण्याला लागूनच हा मतदार संघ आहे. त्यामुळे शिंदे गट विरुद्ध जितेंद्र आव्हाड हा संघर्ष गेल्या काही दिवसापासून पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आता खरेगाव उड्डाण पूलावरील जितेंद्र आव्हाड यांच्या नावाचा बोर्ड महानगर पालिकेने हटवल्यामुळे पुन्हा एकदा हा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाच्या दबावामुळे हा बोर्ड हटवल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. ट्विटमद्धे ते लिहतात की, "किती हे सुडाचे राजकारण... कळव्याच्या पूर्वेला मी जी आमदार निधीतून कामे केली आहेत त्या कामांचा उल्लेख असलेला LED Board आमदार निधी तून लावण्यात आला होता. आज सकाळी अचानक 8 वाजता महापालिकेचे अधिकारी मनिष जोशी यांच्या नेतृत्वाखाली त्या बोर्डची मोडतोड करून तो बोर्ड काढण्यात आला.''
दरम्यान याबाबत जितेंद्र आव्हाड यांचा मतदार संघ असलेल्या ठाण्याच्या फेसबूक पेजवरतीही एक मोठी पोस्ट लिहली आहे. यामध्ये त्यांनी लिहले आहे की, "काल संध्याकाळी गद्दार सेनेचे खासदार आणि शकुनीमामाच्या दौऱ्यानंतर आज सकाळी 7 वाजता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या कामांचा उल्लेख असलेले कळवा पूर्वेमध्ये लावलेले एलईडी बोर्ड काढण्यात आले. हे बोर्ड काढण्याची वेळ होती सकाळी 7 वाजताची. महानगरपालिकेचे सर्वच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते व पोलीस अधिकारी देखिल उपस्थित होते. मी स्वतः महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत फोन केले; त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची उत्तरे नव्हती."
"संपूर्ण ठाण्यामध्ये अनेक राजकीय लोकप्रतिनिधिंचे एलईडी लागलेले आहेत. ते काढा असे मी मुळीच सांगत नाही. पण लागलेले आहेत हे निदर्शनास आणून देतो. मग जितेंद्र आव्हाड यांच्यावरच एवढा राग का?. एक लक्षात ठेवा कि, तुम्ही जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने बोललात कि त्यांचा अंत जवळ आला आहे, त्यांचा शेवट जवळ आला आहे. ही वाक्य घृणास्पद तर आहेतच पण अत्यंत वेदनादायी देखिल आहेत. कळव्यातील जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधकांनाही त्यांच्या विरोधात काढलेली ही वाक्य आवडलेली नाहीत."
"कोणाचाही अंत किंवा कोणाचाही शेवट करण्याची ताकद तुमच्यात नाही. ती फक्त ईश्वरात आहे. तेव्हा वाक्य जपून वापरा. आणि हा जो तुम्ही एलईडी बोर्ड काढला आहे त्यामुळे संपूर्ण मुंब्रा आणि कळव्याच्या जनतेच्या मनामनामध्ये असलेल्या जितेंद्र आव्हाड यांना तुम्ही कधीच काढू शकत नाहीत. हे स्पष्टपणाने मी तुम्हांला सांगू इच्छितो."
"ज्यांना कळव्यात चालू असलेली 8-8 मजल्याची ईमारतीची बांधकामे दिसत नाहीत. त्यांना मात्र एलईडी बोर्ड दिसतो. अर्थात आम्हांला माहीत आहे कि तो कोणाच्या सांगण्यावरून काढण्यात आला. पण फक्त सांगकाम्याची कामे करू नका आपली जबाबदारीही ओळखा."