म्हातारपणाची काळजी दूर करणारी योजना! १३१८ रुपये भरा अन्‌ दरमहा पाच हजार मिळवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Atal Pension Yojana
म्हातारपणाची काळजी दूर करणारी योजना! १३१८ रुपये भरा अन्‌ दरमहा पाच हजार मिळवा

म्हातारपणाची काळजी दूर करणारी योजना! १३१८ रुपये भरा, दरमहा पाच हजार मिळवा

सोलापूर : सर्वसामान्यांची भविष्याची चिंता दूर व्हावी, यासाठी केंद्र सरकारने २०१५-१६मध्ये अटल पेन्शन योजना सुरु केली. टपाल विभागात बचत खाते उघडून त्यात दरमहा ठरावीक रक्कम (वयोमानानुसार) भरल्यास वयाच्या ६० वर्षानंतर पेन्शन सुरु होते. एक हजार रुपयांच्या पेन्शनसाठी ४२ ते १३१८ रुपये आणि पाच हजारांच्या पेन्शनसाठी दरमहा २१० रुपये ते सहा हजार ५९० रुपये भरावे लागतील.

आधारकार्ड आणि पॅनकार्डसोबत दोन फोटो दिले की काही मिनिटात टपाल कार्यालयातून बचत खाते उघडून दिले जाते. त्यानंतर दरमहा त्या खात्यात आपण निश्चित केलेली रक्कम भरावीच लागते. एखाद्या महिन्यात तेवढी रक्कम न भरल्यास १ टक्का दंड लागतो. वयाच्या १८ वर्षापासून ४० वर्षापर्यंत हे खाते उघडता येते. पण, वयोगटानुसार दरमहा भरावी लागणारी रक्कम वाढते. त्यातही एक ते पाच हजारांपर्यंत आपल्याला ६० वर्षांनंतर किती पेन्शन हवी आहे, त्यानुसार हप्ते (दरमहा रक्कम) ठरलेले असतात. म्हातारपणी ज्येष्ठ नागरिकांना कोणावरही अवलंबून राहावे लागू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरु केली आहे. या योजनेला अनेकांची पसंती असून त्याअंतर्गत लाखो खाती उघडली गेली आहेत. बॅंकांमधूनही या योजनेचा लाभ मिळवता येतो. अनेकजण विशेषतः: सुशिक्षितांनी (उच्चशिक्षित) पण या योजनेतून खाती उघडली आहेत.

योजनेबद्दल थोडेसे...

  • अटल पेन्शन योजनेतून ६० वर्षांनंतर मिळते एक त पाच हजारांपर्यंत दरमहा पेन्शन

  • १८ ते ४० या वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला या योजनेतून खाते उघडता येईल

  • १ ऑक्टोबर २०२२ पासून योजनेत बदल करून आयकर भरणाऱ्यांना योजनेतून वगळले

  • अठराव्या वर्षी खाते उघडल्यास एक हजारासाठी ४२ रुपये, तर पाच हजारांसाठी २१० रुपयांचा हप्ता

  • योजनेतून किमान एक ते पाच हजारांपर्यंतच मिळेल पेन्शन; अचानक मृत्यू झाल्यास ‘कॉडप्लस’मधून मदत मिळते

अचानक मृत्यू झाल्यास मिळते एवढी रक्कम...

  • एक हजारांच्या पेन्शनधारकांना : १.७० लाख

  • दोन हजारांच्या पेन्शनधारकांना : ३.४० लाख

  • तीन हजारांच्या पेन्शनधारकांना : ५.१० लाख

  • चार हजारांच्या पेन्शनधारकांना : ६.८० लाख

  • पाच हजारांच्या पेन्शनधारकांना : ८.५० लाख

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ही’ चांगली योजना

सद्यःस्थितीत ज्येष्ठ नागरिक झालेल्यांसाठी देखील केंद्र सरकारने विशेष योजना सुरु केली आहे. त्यात एक हजारांपासून १५ लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते. त्यावर अन्य कोणत्याही योजनांपेक्षा अधिक ७.६ टक्के इतका व्याजदर मिळतो. गुंतवलेल्या रकमेवर दर तीन महिन्याला व्याज काढता येते. पाच वर्षांसाठीच ही योजना आहे. त्याअंतर्गत एक लाख गुंतवल्यास दरमहा १९०० व्याज तर पाच लाख ठेवल्यास दरमहा ९५०० रुपये व्याज मिळते.