Vidhan Sabha 2019 : 'आप'ची पहिली यादी जाहीर; पुण्यातील दोन मतदारसंघाचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 September 2019

पुण्यात कोथरुडमध्ये डॉ.अभिजीत मोरे, तर पर्वतीमधून संदिप सोनवणे 

पुणे ः विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष (आप) उतरणार की नाही, याबाबत गेली अनेक दिवस सुरू असलेल्या तर्कवितर्कांना अखेर पुर्णविराम मिळाला आहे. "आप' विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली असून पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची पहिली यादी सोमवारी जाहिर करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील 8 उमेदरवाराची नावे घोषीत केली आहे. त्यामध्ये पुण्यातील दोन उमेदवांचा समावेश असुन पर्वतीमधून संदिप सोनवणे व कोथरुडमधून डॉ.अभिजित मोरे या उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत. 

मागील लोकसभा निवडणुकीत सुभाष वारे यांनी आपच्यावतीने लोकसभा निवडणुक लढविली होती. त्यानंतर मागील विधानसभा व 2019 ची लोकसभा निवडणुकीमध्ये आप पक्षाने सहभाग घेतला नाही. त्यामुळे यावेळीच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आप उतरणार की नाही, याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. परंतु सोमवारी पक्षाच्या प्रवक्‍त्या प्रिती शर्मा-मेनन व राज्य उपाध्यक्ष किशोर मांदियान यांनी पक्षाच्या उमेदवारांची नावे सोमवारी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले. त्यामध्ये पुण्यातील दोन उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. कोथरुड मतदारसंघासाठी डॉ.अभिजीत मोरे, तर पर्वती विधानसभा मतदारसंघासाठी संदिप सोनवणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. 

"आप'चे कोथरुडचे डॉ.अभिजीत मोरे हे "साथी सेहत' या संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. परवडणाऱ्या दरात ते वैद्यकीय सेवा देतात.जन आरोग्य अभियानाचे ते समन्वयक आहेत. शिक्षण हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी व्हावी, यासाठी ते कार्यरत असतात. सामाजिक प्रश्‍नांवर आवाज उठविणाऱ्या मोरे यांना "अशोक मनोहर युवा पुरस्कार' प्राप्त झाला आहे. "पर्वती'चे उमेदवार सोनवणे पक्षासमवेत दहा वर्षांपासून कार्यरत असून महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी पाच हजार महिलांचे संघटन केले आहे. याबरोबरच शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत त्यांनी 23 हजार विद्यार्थ्यांना त्यांचा हक्क मिळवून दिला आहे, असे पक्षाचे शहराध्यक्ष व प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले. 

आप'चे राज्यातील उमेदवार 
ऍड.परोमीता गोस्वामी (ब्रम्हापुरी, चंद्रपुर) , विठ्ठल गोविंद लाड (जोगेश्‍वरी ईस्ट, मुंबई), डॉ.आनंद दादु गुरव (करवीर, कोल्हापुर), विशाल वडघुले (नांदगाव, नाशिक), सिराज खान (कांदिवली, मुंबई), दिलीप तावडे ( दिंडोशी, मुंबई) या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AAP declares candidates for maharashtra assembly polls