अवलिया लोकसाहित्यिक | Bashirbhai Momin | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bashirbhai momin
अवलिया लोकसाहित्यिक

अवलिया लोकसाहित्यिक

- ॲड. आरती सोनग्रा

आपल्या साठ वर्षांच्या साहित्यसेवेतून ज्यांनी लोकसाहित्याला संपन्न केले असे ज्येष्ठ साहित्यिक, लोकगीतकार बशीरभाई ऊर्फ बी. के. मोमीन (कवठेकर) यांचे नुकचेत निधन (१२ नोव्हेंबर) झाले. जातीभेदाच्या, धर्मभेदाच्या भिंती ओलांडून शेवटच्या श्वासापर्यंत लिहिणारा हा अवलिया लोकसाहित्यिक त्यामुळे महाराष्ट्राच्या कायम स्मरणात राहील.

मोमीन यांनी चार हजारांहून अधिक गण, गवळण, भारूड, गोंधळी गीते, लोकगीते, पोवाडे, लावण्या, चित्रपट गीत, कलगीतुरा, भक्तीगीते, भजने, लोकनाट्य त्यांनी लिहिली. संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकरांपासून ते अगदी बॉलिवूड गायक कुणाल गांजावालांपर्यंत अनेकांनी त्यांची गीते गायली. अशी चौफेर साहित्य सेवा करणाऱ्या मोमीन यांना राज्य सरकारने २०१९ मध्ये विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

कवठे येमाई (ता. शिरूर, पुणे) येथे मार्च १९४७ मध्ये त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. शिक्षणाची सोय नसल्याने त्यांना नववीत शाळा सोडावी लागली. चुलते कवी चंदुलाल यांच्याकडून स्फूर्ती घेऊन त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी गावातील येमाई देवीवर लिहिलेले गीत एका कार्यक्रमात सादर झाले आणि येथूनच त्यांच्या साहित्यसेवेची सुरुवात झाली. पुढे त्यांची ओळख तमाशा गीतकार व वगनाट्य लेखक म्हणून अधीक दृढ होत गेली व ती शेवटपर्यंत कायम राहिली.

विशेषतः त्यांनी लिहिलेली गीते तमाशा फडमालक संगीतरत्न दत्ता महाडिक यांनी गोड आवाजात सादर करून महाराष्ट्रातील तमाशा रसिकांना वेडं लावलं. ‘मोमीननं लिहिलं अन् दत्तानी गायलं'' असा काहीसा शेवट ते आपल्या गीतातून करायचे. सामाजिक संक्रमण, चालिरीती आणि समाजव्यवस्थेतील व्यंग मोमीन आपल्या शब्दात अचूकपणे टिपायचे. ‘लंगड मारतंय उडून तंगडं’, ‘सारं हायब्रीड झालं’, ‘खरं नाही काही हल्लीच्या जगात’, ‘हे असंच चालायचं’, ‘फॅशनच फॅड लागतंय गॉड’, ‘मोमीन कवठेकर म्हणे दत्ता, आली बायांच्या हातात सत्ता’ अशी महाडिकांनी गायलेली अनेक गीते ऐकायला रसिक मैलोंमैल चालत यायचे.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’, ‘भंगले स्वप्न महाराष्ट्रा’, ‘तांबडं फुटल रक्ताचं’, ‘इष्कानं घेतला बळी’, ‘फुटला पाझर पाषाणाला’, ‘भक्त कबीर’, ‘हुंड्यापायी घडलं सारं’.... आदी वगनाट्य, तर ‘सोयऱ्याला धडा शिकवा’, ‘मनाला आळा एड्स टाळा’, ‘दारू सुटली, चालना भेटली’, ‘बुवाबाजी ऐका माझी’, ‘साक्षरता’ आदी लोकनाट्ये त्यांनी आकाशवाणीसाठी लिहिली.

गण, गवळण, लावण्यांचे विविध प्रकार लिहिण्यावर मोमीन यांचा विशेष हातखंडा होता. मोमीन यांच्या लेखणीतून अवतरलेल्या लोकसाहित्याच्या या पारंब्या आजही तमाशा क्षेत्रात खोलवर रुजल्या आहेत. त्यांच्या ‘भंगले स्वप्न महाराष्ट्रा’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक नाटकांचे प्रयोग पुण्यात झाले. त्यात त्यांनी अभिनय केला. व्यसन, अंधश्रद्धा, हुंडा प्रथेवर लोकनाट्यातून आसूड ओढले. संघटना काढून कलावंतांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला. कलावंतांना मानधन मिळवून दिले. देशभक्ती गीते, शेतकरी गीते, पुरोगामी विचार मांडणारी शेकडो गीते त्यांनी रचली. म्हणून पुण्यात मुस्लीम सत्यशोधक समाजातर्फे त्यांचा विशेष सन्मान झाला होता.

१९७० ते १९९५ च्या काळात तमाशा क्षेत्रात निर्विवाद अधिराज्य गाजवणारे नाव म्हणजे मोमीन कवठेकर होते. त्यांच्या लेखणीतून सिंचित लोकसाहित्याच्या या पारंब्या आजही तमाशा क्षेत्रात खोलवर रुजल्या आहेत. लोककलावंतांचा अभ्यास करून त्यांनी ‘कलावंतांच्या आठवणी’ हे पुस्तक लिहिले. मोमीन यांच्या साहित्यावर पुणे विद्यापिठात पीएडी करण्यात आली होती. त्यांना ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्तीसाठी शासनाचा पुरस्कार, अमोल पालेकर यांच्या हस्ते छोटू जुवेकर पुरस्कार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पद्मश्री विखे पाटील जीवगौरव पुरस्कार मिळाला होता. योगायोग असा की मोमीन यांचे निधन झाले, त्याच दिवशी नेमके मुंबईत त्यांच्या एका चित्रपट गीताचे रेकॉर्डिंग सुरू होते. जणू त्याच संगीत स्वरांमध्ये बशीरभाईंचा शेवटचा श्वास विलीन झाला असावा.