अबब..! १५ महिन्यांत सोलापूर जिल्ह्यातील २३५२ महिला-मुली बेपत्ता; ५४६ जणी सापडल्या नाहीत

जानेवारी २०२२ ते मार्च २०२३ या १५ महिन्यांत सोलापूर शहरातील १०७ अल्पवयीन मुली, ४८७ तरुणी, महिला बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांत झाली. दुसरीकडे ग्रामीणमधील साडेबाराशे मुली, महिला बेपत्ता झाल्या. त्यातील ५४६ मुली, महिला, तरुणी अजून सापडलेल्या नाहीत, हे विशेष.
बेपत्ता महिला मुली
बेपत्ता महिला मुलीSakal

सोलापूर : शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातून अल्पवयीन मुली व महिला, तरुणी बेपत्ता तथा घर सोडून निघून जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. जानेवारी २०२२ ते मार्च २०२३ या १५ महिन्यांत सोलापूर शहरातील १०७ अल्पवयीन मुली तर ४८७ तरुणी, महिला बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांत झाली. दुसरीकडे ग्रामीणमधील साडेबाराशे मुली, महिला बेपत्ता झाल्या. त्यातील तब्बल ५४६ मुली, महिला, तरुणी अजूनही सापडलेल्या नाहीत, हे विशेष.

स्पर्धेच्या काळात आई-वडिलांना आपल्या मुलांच्या अडचणी जाणून घ्यायला, त्यांच्यातील बदल समजून घ्यायला, सुसंवादासाठी सुद्धा पुरेसा वेळ मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. कोरोनाच्या संकटानंतर विवाहातील मानपान, हुंडा पुरेसा दिला नाही म्हणून कौटुंबिक छळाच्या घटना वाढल्या आहेत. तसेच नोकरी गेल्याने नवीन वाहन घ्यायला, व्यवसाय टाकायला माहेरून पैसे आण म्हणून देखील विवाहितांचा छळ केला जात आहे.

सासरच्यांकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून काही महिला घर सोडून निघून गेल्या आहेत. दुसरीकडे प्रेमप्रकरणातून विवाहाचे आमिष देऊनही अनेक मुली-महिला त्यांच्या आवडीच्या व्यक्तीसोबत पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. मोबाईलचा (सोशल मीडिया) वापर वाढला असून समोरील व्यक्तीकडून त्या मुलीला-महिलेला अनेक प्रलोभने दाखवली जातात. त्यातूनही पळून जाण्याचे प्रमाण वाढल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे.

पालकांनी आपल्या मुलांसोबत नेहमीच सुसंवाद ठेवावा. अपयशात त्यांच्यासोबत असल्याचा आत्मविश्वास द्यायला हवा. त्यांचे मित्र-मैत्रिणींची माहिती पालकांना हवी. कुटुंबात वादविवाद नको, मुलींना वारंवार शिक्षणातून स्वावलंबी बनण्यासाठी प्रोत्साहित करावे. विवाहानंतर कौटुंबिक भांडणे नकोच, समजूतदारपणा हवा, जेणेकरून पुन्हा पश्चात्तापाची वेळ येणार नाही.

पळून जाण्याची प्रमुख कारणे...

  • - सोशल मिडियाचा (मोबाईल) वापर प्रचंड वाढला

  • - पतीसह सासरच्यांकडून होणारा सततचा कौटुंबिक छळ

  • - प्रेम प्रकरणातून आवडीच्या व्यक्तीकडून लग्नाचे आमिष

  • - महागाई वाढली, पतीचा नोकरी गेली, कौटुंबिक आर्थिक चणचण

  • - वय वाढल्यानंतरही बिकट परिस्थितीमुळे आई-वडिलांकडून नाही लग्नाचा विचार

बेपत्ता मुली-महिलांचा शोध सुरु

प्रेमप्रकरण, कौटुंबिक कलह, आर्थिक अडचणी, सोशल मिडियाचा अतिवापर, अशा अनेक कारणांतून महिला, मुली, तरुणी पळून जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अनेकांना शोधले असून उर्वरित मुली, महिलांचा देखील शोध सुरु आहे.

- डॉ. राजन माने, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

...तरी ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल होतोच

अल्पवयीन मुलींवर ती समजूतदार होण्यापूर्वी, उमलण्याच्या वयात ओळखीच्या लोकांकडून काहीतरी आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले जातात. अशावेळी बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंध कायदा- २०१२नुसार संबंधितावर कारवाई होते. दरम्यान, मुलीचे १८ वर्षे पूर्ण होण्यासाठी काही महिने शिल्लक असताना अनेकजण प्रेमप्रकरणातून पळून जातात. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते परत येतात. काहींना त्या काळात एक बाळ देखील होते. अशा प्रकरणात दोघांचीही संमती असली, तरीदेखील त्या मुलावर ‘पोक्सो’अंतर्गत कठोर कारवाई होतेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com