Abdul Sattar: खोक्याच्या टीकेवरुन सत्तारांची जीभ घसरली, सुप्रिया सुळेंना शिवीगाळ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Abdul Sattar

Abdul Sattar: खोक्याच्या टीकेवरुन सत्तारांची जीभ घसरली, सुप्रिया सुळेंना शिवीगाळ!

मुंबई : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रीया सुळे यांच्यावर एकदा नव्हे अनेकदा आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून सत्तारांनी २४ तासांत माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा त्यांना दिला आला आहे. (Abdul Sattar criticizes Supriya Sule in offensive language Warning of NCP apologize)

हेही वाचा: Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत येण्यास सेलिब्रिटी घाबरतात? फडणवीसांनी दिलं पटोलेंना उत्तर

सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तारांवर टीका करताना म्हटलं होतं की, पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का? यावर सत्तारांनी उत्तर देताना म्हटलं, ते तुम्हाला हवे आहेत का? य़ावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुमच्याकडे खोके आले असतील म्हणूनच तुम्ही ते आम्हाला ऑफर करता आहात. सुप्रिया सुळे यांच्या या विधानावर सत्तार भडकले आणि त्यांचं आपल्या बोलण्यावरील नियंत्रण सुटलं अन् ते म्हणाले, इतकी भिकार....झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही देऊ.

सुप्रिया सुळेंना अशा प्रकारे शिवीगाळ का केली? असा सवाल जेव्हा सत्तारांना पत्रकारांनी विचारला तेव्हा सत्तार म्हणाले, "ते आम्हाला खोके बोलत आहेत त्यांचे डोके तपासायला पाहिजेत त्यासाठी सिल्लोडमध्ये एक दवाखाना उघडतो. या दवाखान्यात जे खोके खोके करत आहेत, त्यांचे डोके तपासावे लागतील. राजकारण हा भिकार धंदा आहे. आम्ही दररोज मतं मागतो, नगरपालिका, पंचायत समित्या, लोकसभा, विधानसभा हे मतांचे भीक मागणारे भिकारी नाहीत. यांचे पतीदेव उद्योगपती आहेत म्हणून यांना उद्योगपतीचा दर्जा द्यायचा का?"

राष्ट्रवादीकडून २४ तासांचा अल्टिमेटम

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, "सत्तेचा माज असलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार नावाच्या वाह्यात व्यक्तीनं सुप्रिया सुळेंबाबत जो शब्द वापरलेला आहे, त्यासाठी सत्तार यांनी २४ तासात सुप्रिया सुळे यांची नाक घासून माफी मागावी अन्यथा आम्ही त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही. सत्तारांना आम्ही त्यांची लायकी दाखवून देऊ"