
सोलापूर जिल्ह्यावरच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रावर ‘अकलूज संस्थान’चे वर्चस्व असताना ‘डाएट'चे कार्यालय वेळापूर येथे सुरू करण्यात आले.
जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने तसेच शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व पर्यवेक्षीय अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्याचे काम परिणामकारक होण्यासाठी ‘डाएट’ कार्यालय सोलापुरात स्थलांतरीत होण्याची निकड आहे. अत्यंत महत्त्वाचे व प्रभावी असलेल्या वेळापूर (ता. माळशिरस) येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची (डाएट) स्थिती ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. हा विभाग जिल्ह्याच्या एका टोकाला असल्याने शिक्षक, प्रशासकीय यंत्रणेतील समन्वयात अडचणी येत आहेत. शिक्षक व यंत्रणेच्या समन्वयासाठी सोयीच्या ठिकाणी म्हणजे मुख्यालयात कार्यालय झाल्यास याचे काम ठसा उमटविणारे होईल.
सोलापूर शहरात हे कार्यालय होण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, शिक्षण आयुक्त, सचिव, पालकमंत्री, शिक्षण मंत्र्यांच्या पातळीवर प्रयत्न झाले. परंतु, या प्रयत्नांना पद्धतशीरपणे हरताळ फासण्यात आला. केवळ विरोधासाठी नव्हे तर या यंत्रणेद्वारे समन्वय व गुणवत्ता वाढीचे काम व्यवस्थित होण्यासाठी जोर लावला जावा, अशी अपेक्षा आहे. नॉर्थकोटमध्ये हे कार्यालय स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात येऊन तो वाऱ्यावरच राहिला.
सोलापूर जिल्ह्यावरच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रावर ‘अकलूज संस्थान’चे वर्चस्व असताना ‘डाएट'चे कार्यालय वेळापूर येथे सुरू करण्यात आले. यासाठी तब्बल कोट्यवधीचा निधी देऊन भली मोठी इमारत उभारली. जिल्ह्यातील खूपच महत्त्वाचे व प्रतिष्ठेचे असलेले ‘डाएट’ कार्यालय आपल्या भागातच व्हावे, या उद्देशाने तत्कालीन राज्यकर्त्यांनी हे कार्यालय वेळापूरला नेले. परंतु, सोलापूर ते वेळापूर हे अंतर ११० किलोमीटर आणि तेथून तीन किलोमीटर दूर असलेल्या कार्यालयास जाण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. अक्कलकोट तालुक्यातील अगदी टोकाच्या गावच्या शिक्षकास या कार्यालयाकडे जाण्यासाठी संपूर्ण दिवसच लागतो. त्यामुळे शिक्षकांमध्ये ‘डाएट़’च्या उपक्रमांबाबत अनास्थाच जाणवते.
‘डीएड’ महाविद्यालयांची तपासणी, तुकडी मान्यता, अंतर्गत मूल्यमापन, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या उद्देशाने हा विभाग सुरू करण्यात आला. पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्ह्यातील तब्बल पाच लाख विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासात या विभागाचा मोठा वाटा आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी), प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभाग, महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या समन्वयातून ‘डाएट’ विभागाकडून विविध प्रशिक्षण, योजना राबविण्यात येत असतात. सेवांतर्गत प्रशिक्षण देऊन शिक्षकांचे सक्षमीकरण केले जाते. शिक्षकांना संशोधन व नवोपक्रमाचे मार्गदर्शन घेण्यासाठी ‘डाएट’ला यावे लागते. अशावेळी शिक्षकांची मोठी गैरसोय होते. भौगोलिकदृष्ट्या गैरसोयीचे ठिकाण असल्याने शिक्षकांच्या प्रतिसादाचा अभाव जाणवतो.
वेळापूरला असलेल्या या विभागास विरोध नाही; परंतु हे केवळ काही ठराविक अधिकाऱ्यांच्या सोयीचे ठिकाण झाले आहे. वेळापूरला ‘डाएट’ची मोठी इमारत असल्याने त्याचे काय करायचे, असा प्रश्न उपस्थित होईल. परंतु विद्यार्थ्यांची गुणवत्ता महत्त्वाची की इमारत? मूळ योजनेलाच हरताळ फासला जात असेल तर योजनाच काय कामाची, हा मुद्दाही महत्त्वाचाच आहे. या इमारतीत राज्य शासनाचे आरोग्य सुविधा केंद्र केल्यास ते पालखी मार्गावरील वारकऱ्यांना उपयोगी ठरेल. या पालखी मार्गाचे महामार्गात रूपांतर झाल्याने त्याचा फार चांगला उपयोग होईल, असे वाटते. या विभागात सुपर क्लासवन एक, वर्ग एक दर्जाचे चार, दोन दर्जाचे सहा त्यातही ८० टक्के अधिकारी पीएच.डी.धारक आहेत. त्यांच्या ज्ञानाचा योग्य उपयोग व्हावा, अशी अपेक्षा आहे. केवळ येथे काम करणाऱ्या काही अधिकाऱ्यांना बदलीचे ठिकाण सोयीचे व्हावे, यासाठी हा विभाग वेळापूरला ठेवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, संबंधित प्रशासन यांच्यासोबत समन्वय साधताना गैरसोयीच्या ठिकाणामुळे अडचणींना तोंड द्यावे लागते. येथील काही अधिकाऱ्यांना कोणाचेही नियंत्रण नको असल्याने कार्यालय बदलण्याची केवळ चर्चाच होते. त्याची फाईल मात्र पुढे सरकविली जाऊ नये, ही मानसिकता आहे.
दोन जिल्ह्यात बदल
सोलापूर जिल्ह्यातील शाळांसाठी स्वच्छ विद्यालय पुरस्कार योजना आली. तेव्हा ९६ टक्के शाळांनी प्रतिसाद देत या योजनेत सहभाग नोंदविला. परंतु, या शाळांचे मूल्यमापन शिक्षण विभाग करणार की ‘डाएट’, या वादात आणि केवळ समन्वय व नियंत्रणाअभावी चांगल्या योजनेला हरताळ फासला गेला. लोणी काळभोर (जि. पुणे) व वैजापूर (जि. औरंगाबाद) येथेही सोलापूरप्रमाणेच जिल्हा मुख्यालयापासून दूर अंतरावर ‘डाएट’ कार्यालय होते. नंतर ते मुख्यालयात आणण्यात आले.
फोकस...
पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक शैक्षणिक गुणवत्तावाढीची योजना
शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे व्यवस्थापन, नियोजनाची जबाबदारी
वर्ग ३ व ४ कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण देणारी शिखर संस्था
पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांची मासिक आढावा बैठक घेताना अडचण
जागा बदलल्यास शिक्षक व पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांची पैशाची व वेळेची बचत
जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष
केवळ फलटण व वेळापूर अशा सोयीच्या बदलीचे ठिकाण
ग्लोबल टीचरच्या कागदावरील नियुक्तीच्या ‘डाएट’मध्येच वादाची सुरवात
विषय तज्ज्ञ, विशेष तज्ज्ञ, विषय शिक्षक अशा एकूण १८४ कर्मचाऱ्यांवर सनियंत्रण
जिल्हाधिकारी कार्यालय स्थलांतरानंतर किंवा जिल्हा परिषदेतील सोयीची जागा
आकड्यांचा खेळ...
व्यवस्थापनाच्या शाळा - ४७७३
विद्यार्थी -८४,७८९०
शिक्षक -३०,५५६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.