विकासाची नवी वाट नवी दिशा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abhijit Pawar writes about Sakal Media Group development programme

ज्येष्ठांचं संघटन... ‘सिम्पल’
‘सकाळ’च्या वतीनं समाजातील ज्येष्ठ नागरिकांचंही संघटन उभं केलं जाणार आहे. ‘सीनियर युथ मूव्हमेंट फॉर पीस लर्निंग अँड एन्जॉयमेंट - सिम्पल’ या नावानं ज्येष्ठांसाठीचं हे नेटवर्क राज्यभरात तयार होईल. ज्येष्ठांसाठी रंजनापासून ते त्यांच्या अनुभवाचा परिवर्तनाच्या कामात सहयोग घेण्यापर्यंत आणि त्यांना कालसापेक्ष नवी कौशल्यं शिकवण्यापर्यंतचे उपक्रम ‘सिम्पल’द्वारे होतील. खास ज्येष्ठांसाठीचं नियतकालिक तसंच डिजिटल प्लॅटफॉर्मही ज्येष्ठांच्या सेवेत असेल. समाजसंशोधक डॉ. आनंद करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे नेटवर्क काम करणार आहे. याविषयीचे तपशील यथावकाश जाहीर करीत आहोत.

विकासाची नवी वाट नवी दिशा

सात दशकांपूर्वी याच दिवशी, १५ ऑगस्टला, आपला देश परकीयांच्या जोखडातून मुक्त झाला. एका नव्या भारताचे स्वप्न घेऊन सुरू झालेल्या प्रवासाला ७० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! देशाला परकीयांपासून स्वातंत्र्य मिळालं, पण आता आणखी अनेक बाबींपासून आपल्याला स्वातंत्र्य हवं आहे. रखडलेला विकास, अडलेली, रेंगाळणारी कामं, शासकीय लाल फीतशाही, यांपासून रोजच्या जगण्यातील अनेक प्रश्‍नांपर्यंत आपल्याला उत्तरं हवी आहेत, त्यापासून सुटका हवी आहे. साधारणपणे या साऱ्यासाठी शासकीय व्यवस्थेला जबाबदार धरले जाते. या यंत्रणांची जबाबदारी दाखवून द्यायलाच हवी; मात्र आता आपले प्रश्‍न सोडवण्यासाठी, खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य अधिक संपन्न बनवण्याठी लोकांनीच एकमेकांची साथ देत उभं राहायला हवं. आजचा हा संवाद याचसाठी.

मागच्या ७० वर्षांत अनेक क्षेत्रांत भारताने भरीव कामगिरी केली आहे. टाचणीही तयार न होणाऱ्या देशात क्रायोजेनिक इंजिनही उत्पादित होऊ लागलं ही झेप मोठीच. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा यातल्या प्रगतीतून जीवनमानात निश्‍चितच फरक पडला. मात्र, झाली ती प्रगती उद्याच्या जगात सक्षमपणे वावरायला पुरेशी नाही. सर्वच क्षेत्रात आपल्याला मोठ्या गतीनं झेप घ्यावी लागणार आहे. लोकांना अपेक्षा असते राजकीय नेतृत्वाकडून आणि नेतृत्व बदलानं फार मोठ्या बदलांची अपेक्षा ठेवली जाते. राज्य करणाऱ्या पक्षाला किंवा नेत्यामागं बहुमत नसल्यानं गतीनं सुधारणा होत नाहीत असं एक मत मांडलं जातं, भारतीय जनतेने केंद्रात नरेंद्र मोदी असतील, दिल्लीत प्रचलित राजकीय चौकटीबाहेरचं नेतृत्व असलेले अरविंद केजरीवाल असतील त्यांना स्पष्ट बहुमत दिलं. किंवा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने नवा तरुण चेहरा पुढे आणला. तरीही आपल्याला अपेक्षित गतीनं जगणं समृद्ध करणारे बदल होत नाहीत, यात नेत्याचा किंवा यंत्रणांचाच दोष आहे अशातला भाग नाही. अनेकदा अधिकारावर असलेल्यांना काम करायची इच्छा असते ते करायचा प्रयत्नही करतात. मात्र, हितसंबंधी गट त्यात खोडा घालतात. विकासाच्या कामात अडथळे बनतात.

विकासकामांच्या टेंडर प्रक्रियेपासूनच याची सुरवात होत असल्याचा अनुभव येतो; मग दिरंगाई आणि त्यातून निराशा पदरी पडायला सुरवात होते. हे टाळायचे तर असे आडवे येणाऱ्यांना रोखणारी ताकद आपल्याला तयार करावीच लागेल. सारे लोक विशिष्ट काम व्हावे, या बाजूने असताना कोणीतरी अधिकारी फायलींवर बसून राहतो, कोणीतरी माहितीच्या अधिकारासारख्या अत्यंत चांगल्या कल्पनेचा गैरवापर करून सारं ठप्प करू पाहतो, याला सामूहिक शक्तीने आळा घालावा लागेल. नागरिकांचे एकमेकांना मदत करणारे नेटवर्क तयार करणं, हाच यावरचा उपाय आहे. लोकांच्या अशा सकारात्मक नेटवर्कला ‘सकाळ’ प्रोत्साहन देईल, त्यासाठी पुढाकारही घेईल. आपल्याला संपूर्ण नव्या पद्धतीनं परिवर्तनाच्या प्रक्रियेकडे पाहावं लागेल. ‘सकाळ माध्यम समूह’ यासाठी पुढाकार घेतो आहे. आर्थिक, भावनिक, शारीरिक आणि आत्मिक पातळीवरही संपन्न असा माणूस घडवणं हे आपल ध्येय असलं पाहिजे. ‘सकाळ’चे भविष्यातील सर्व उपक्रम याच सूत्राभोवती गुंफलेले असतील.

या सर्व नव्या उपक्रमांच्या यशस्वितेबद्दल आणि त्यातून लोकसहभागाबद्दल आम्हाला खात्री आहे. यापूर्वीही ‘सकाळ’नं हाक दिली त्या प्रत्येक वेळेस महाराष्ट्राच्या सर्व भागातून उदंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातले अडीच ते तीन कोटी नागरिक ‘सकाळ’च्या विविध उपक्रमांमधून ‘सकाळ समूहा’शी जोडले गेले आहेत, म्हणूनच अनेक मोठी कामं उभी राहिली याचा अनुभव आपल्या पाठीशी आहे. आपण एकत्र येऊन काम करतो तेव्हा प्रश्‍नांच्या गाठी सुटायला मदत होते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे राज्यातील पाण्याचा प्रश्‍न. ‘सकाळ’ने राज्याला दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने या प्रश्‍नाचा ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून अभ्यास केला. राज्यातून या विषयातले तज्ज्ञ, शासकीय अधिकारी ते शेतकरी अशा सर्वांना एकत्र आणणारी वॉटर लॅब मुंबईत घेतली आणि त्यातून राज्य पाणीदार बनवणारी सूत्रं हाती लागली. पाणी व्यवस्थापनाचा नवा दृष्टिकोन समोर आला. यातीलच काही सूत्रे एकत्र करून राज्याचे जलयुक्त शिवार धोरण साकारले. त्याचा लाभ हजारो गावांना होतो आहे. ‘सकाळ’ने राज्यातील २५६ गावांत पाणी अडवण्याचे प्रयोग तनिष्का चळवळीतील महिलांच्या पुढाकाराने आणि गावकऱ्यांच्या सहभागाने केले. यात ५३० कोटी लिटरहून अधिक पाणीसंचयक्षमता निर्माण झाली आहे. यातील अनेक गावे टॅंकरपासून मुक्त झाली. नद्या, ओढे, नाले पुन्हा वाहते झाले. शास्त्रशुद्ध अभ्यास, तज्ज्ञांची मदत आणि सामान्यांचा कृतिशील सहभाग यातून परिवर्तन घडू शकतं याचं हे निदर्शक आहे. मात्र, नुसतं पाणी अडवून आणि साठवून काही होणार नाही. उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी आणि शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शेतीविषयक मूलभूत कौशल्य प्रशिक्षणाचा व्यापक कार्यक्रम ‘सकाळ’ हाती घेत आहे. 

हाच अनुभव तनिष्का आणि यिन या महिला आणि महाविद्यालयीन तरुणांच्या नेटवर्कने दिला आहे. तनिष्काच्या नेटवर्कनं महाराष्ट्राच्या सर्व भागात महिलांच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसोबतच महिलांमध्ये आत्मविश्‍वास जागवण्याचं आणि नवं नेतृत्व घडवण्याचं असाधारण काम करून दाखवलं आहे. या महिलांनी आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, सिंचन, वाहतूक नियोजन ते महिलांमधील उद्योजकता अशा विविध क्षेत्रांत पंधरा हजारांहून अधिक यशकथा घडवल्या आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जलयुक्त शिवारच्या गुणवत्ता तपासणीसाठी तनिष्काची मदत घ्यावी वाटते, गुगलसारख्या तंत्रज्ञानातील महाप्रचंड कंपनीला ग्रामीण भागात इंटरनेटचा प्रसार करण्यासाठी तनिष्काच्या प्रतिनिधींचा सहभाग आवश्‍यक वाटतो, हे या चळवळीनं कमावलेलं यश आहे. ते ‘सकाळ’ने शोधलेल्या आणि राबवलेल्या सर्वसमावेशक प्रक्रियेचंही यश आहे. याच प्रयत्नांना जोडून आता ‘सकाळ’ शासनाच्या मदतीने महिलांसाठी अन्नपूर्णा योजना सुरू करत आहे. यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कने (यिन) युवकांमध्ये समाजाविषयी आस्था जागवतानाच नेतृत्वविकास आणि भावी जीवनात आवश्‍यक कौशल्यांचा विचार, विकास करणारी भक्कम यंत्रणा तयार केली आहे. तीन हजार महाविद्यालयांत २५ लाख युवकांपर्यंत हे नेटवर्क पोचले आहे. आता कॅटॅपुल्टच्या सहकार्याने स्टार्टअपविषयी मानसिकता तयार करणारा उपक्रम सकाळ राबवत आहे.

अपेक्षा महाराष्ट्राच्या या उपक्रमातून ‘सकाळ’ने सोळा विविध क्षेत्रांतील वाटचाल कोणत्या दिशेनं झाली तर महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती होईल यांचा धांडोळा घेतला होता. यात नियोजनकर्ते, धोरणकर्ते, तज्ज्ञ यासोबतच त्या-त्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणारे आणि सामान्यांचाही सहभाग होता, यातून पाच वर्षांत किती गुंतवणूक करावी लागेल किती रोजगार निर्माण करावे लागतील आणि सकल उत्पन्न किती वाढायला हवे, याची अभ्यासपूर्वक मांडणी केली होती. या आघाडीवर काय होते आहे, याचाही सातत्यानं ‘सकाळ’मधून पाठपुरावा करीत आहोत. महाराष्ट्रात गतीनं प्रगती घडवायची असेल तर विविध क्षेत्रांत मिळून किमान ५०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करावी लागेल. ही गुंतवणूक कुठे, किती, कशी व्हायला हवी, ती कुठून आणायची, याविषयी आम्ही अभ्यास करीत आहोत. शासनासह आणि लोकांच्या सहभागातून हे उद्दिष्ट्य पूर्ण करता येणं शक्‍य आहे असा आमचा विश्‍वास आहे.  

माणसाच्या जीवन वर्तुळाशी निगडित अशी, प्रत्येक टप्प्यावर त्याला उन्नत व्हायला मदत करणारी व्यवस्था उभी केली पाहिजे, असं ‘सकाळ’ला वाटतं. याच उद्देशानं पुढच्या काळात आम्ही प्रामुख्याने सात क्षेत्रांवर भर 
देणार आहोत. 

योग्य कौशल्यांचं प्रशिक्षण हा यापुढच्या काळात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बनलेला असेल. रोजगाराभिमुख कौशल्यं देणं आणि नंतर आयुष्यभर नवी कौशल्य शिकणं याला वाढत्या स्पर्धेच्या युगात पर्याय नाही. ‘सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर’च्या (एसआयएलसी) माध्यमातून नवउद्योजकतेची पायाभरणी करणाऱ्या कौशल्यांचं प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेत आहोत. नव्या पिढीला, नव्या कौशल्यांसह जोडून घेणाऱ्या या शैक्षणिक उपक्रमांसाठी एसआयएलसी आता एका विद्यापीठाचीही निर्मिती करत आहे. यिन-कॅटॅपुल्ट या उपक्रमातून ‘यिन’शी जोडलेल्या तीन लाख विद्यार्थ्यांना नवउद्योजकतेचा मंत्र दिला जाईल. कॅटॅपपुल्ट हॉवर्ड बिझनेस स्कूल, केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, गुगल, मॅकॅन्झी अँड कंपनी, बीबीडीओ, अशोका युथ व्हेंचर आणि डीलए पायपर आदी नामांकित संस्थांबरोबर काम करत आहे.

योग्य गुंतवणूक हा संपत्ती निर्मितीचा राजमार्ग आहे. यासाठी वित्तीय क्षेत्रातली जाण आवश्‍यक असते, शिस्त आवश्‍यक असते. लोकांची गुंतवणूक अभ्यासपूर्वक आणि योग्य ठिकाणी करून त्या गुंतवणुकीचे लाभ मिळवून देणारे दोन-तीन प्रकारचे निधी (इम्पॅक्‍ट फंड) उभे करण्याची योजना आहे. सामाजिक उत्तरदायित्व जपणाऱ्या (सोशली रिस्पॉन्सिबल) उद्योगांमध्ये गुंतवणूक ही या फंडाची दिशा असेल. स्मार्ट सिटीज्‌, स्मार्ट व्हिलेजेस, अन्नपूर्णा अशा समाजहितैषी उद्योगांमध्ये गुंतवणुकीची संधी या फंडामध्ये सामान्य माणसाला मिळेल. यासोबतच सामान्य माणसाला त्याच्या गुंतवणुकीवर फायदा मिळवून देणारा पर्सनल फंड, नवनवीन कल्पनांना बळ देण्यासाठी स्टार्टअप फंडही असतील. ‘सकाळ’शी जोडलेल्या वाचकांना पर्सनल फायनान्स या विषयावर परिपूर्ण माहिती देणारं नियतकालिक आणि डिजिटल प्लॅटफॉर्मही लवकरच आकाराला येईल. यथावकाश त्याची घोषणा केली जाईल.

सकाळ, सकाळ टाइम्स, गोमंतक, गोमंतक टाइम्स, ॲग्रोवन; तसेच अनेक नियतकालिके, साम टीव्ही, ई सकाळ आणि अन्य वेबसाइट्‌स असा सकाळ बहुमाध्यम समूह बनला आहे. उपासना, प्रसार आणि सेवा अशी त्रिसूत्री समोर ठेऊन निरनिराळ्या क्षेत्रांसाठी नियतकालिके आणि डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येतील. तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक, गुंतवणूकदार आदींचा यात प्राधान्यानं विचार केला जाणार आहे.

(ॲडव्हायजरी, कन्सल्टंसी) : सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठीच्या सल्ला सेवांसाठी डीसीएफ ॲडव्हायजरीची उभारणी केली आहे. निरनिराळ्या पातळ्यांवर व्यूहात्मक सल्ला आणि अंमलबजावणीसाठीचं मार्गदर्शन शासनाला पुरवणारी ही यंत्रणा आहे. पॅलेडियम, पेमांडू असोसिएट्‌स आणि इस्राईलमधील तेल अविव म्युनिसिपालिटीसारख्या अत्यंत उत्तम प्रयोग यशस्वी करणाऱ्या संस्थांचं सहकार्य यामध्ये घेण्यात येणार आहे. शासकीय, आर्थिक आणि एकंदरच धोरणांच्या स्तरावर सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ही यंत्रणा संबंधित घटकांना मदत करेल.

(कम्युनिटी ट्रान्सफॉर्मेशन) : डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन, सकाळ रिलीफ फंड, सकाळ सोशल फाउंडेशन या यंत्रणांमार्फत समाजाच्या नेमक्‍या गरजा लक्षात घेऊन परिवर्तनाचे कार्यक्रम राबवले जातील. राज्याच्या विविध भागांतील महिलांना रोजगाराची संधी देणारा अन्नपूर्णा उपक्रम लवकरच प्रत्यक्षात येईल. या उपक्रमात महिला त्या-त्या भागातील लोकप्रिय पदार्थांचं उत्पादन करतील. त्यासाठी व्यापक मार्केट उपलब्ध करून दिलं जाईल. तनिष्काच्या सहयोगातून तीन लाख महिलांपर्यंत या अन्नपूर्णा योजना पोचवण्यात येतील. यासोबतच ग्रामीण भागात तीन लाख जणांना शेतीविषयक मूलभूत कौशल्य प्रशिक्षणाचा (ॲग्री स्कीलिंग) व्यापक कार्यक्रम राबवला जाणार आहे. ‘ॲग्रोवन’च्या पुढाकारातून 
साकारणारा हा कार्यक्रम शेतीत ठोस आणि सकारात्मक परिवर्तन आणेल यात शंका नाही. याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘सिम्पल’ नेटवर्क आणि समाजातल्या सर्व घटकांना त्यांच्या प्रश्‍नांवर उत्तरं शोधण्याकरता एकत्र आणणारं ‘महान राष्ट्र नेटवर्क’ही ‘सकाळ’ने उभे केले आहे.

समाज परिवर्तनाच्या या नव्या कल्पनांना सकाळ इव्हेंट्‌सच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची जोड असेल. या वर्षी जानेवारी महिन्यात मुंबईत झालेल्या ‘डिलिव्हरिंग चेंज फोरम’द्वारे किंवा गेली बारा वर्षे होत असलेल्या ‘एज्युकॉन’ परिषदांद्वारे ‘सकाळ’ने जगभरातले तज्ज्ञ आणि वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या, करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या अन्य भागांतील क्रियाशील लोकांना एकत्र आणलं आहे. यासारखी आणखी व्यासपीठे भविष्यात निर्माण व्हावीत, असा ‘सकाळ’चा प्रयत्न असेल. देशात आणि देशाबाहेरही ज्यांच्याकडे समाजाला सांगण्यासारखं, देण्यासारखं काही आहे, अशा सर्वांसाठी ही व्यासपीठे उपलब्ध असतील. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामाच्या विकासाच्या उत्तम पद्धतींचा मागोवा घेत राहण्यासाठी, शिकण्यासारखे जे आहे ते आपल्याकडे कसे आणता येईल, यासाठी आम्ही आता जर्मनीतील बर्लिन येथे आणि इस्रायलमध्येही कार्यालये सुरू करत आहोत. ‘वसुधैव कुटुंबकम्‌’ ही आपली परंपरा आहे. जग जवळ येत असण्याच्या या काळात जगभर जे काही चांगलं आहे ते आपल्याकडे आणावं, आपलं जीवन भौतिक आणि मानसिक पातळीवरही अधिक समृद्ध व्हावं ही या उपक्रमांची दिशा असेल.

(स्पेशल प्रोजेक्‍ट्‌स) : स्मार्ट सिटी, स्मार्ट व्हिलेज, स्टार्टअप आदी क्षेत्रांत विशेष प्रकल्प राबवले जाणार आहेत. ग्रामविकासाचं एक आदर्श मॉडेल अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि लोकसहभागातून स्मार्ट व्हिलेजद्वारे उभे राहात आहे. इस्रायली तज्ज्ञांच्या सहकार्यानं पाच निवडक गावांत ही चळवळ सुरू झाली आहे. स्मार्ट सिटीच्या उपक्रमातही तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून नागरिक आणि प्रशासन यांच्यात सतत संवाद ठेवणारी यंत्रणा उभी करणारे प्रयोग करीत आहोत. ‘डिजीठाणे’सारख्या उपक्रमातून याची ठाण्यात सुरवात होते आहे. स्मार्ट नागरिक तयार व्हावा, त्याचं जगणं अधिक अर्थपूर्ण सुसह्य बौद्धिकदृष्ट्या सक्रिय (इंटेलिजन्टली ॲक्‍टिव्ह) व्हावं, हा या प्रकल्पांमागचा उद्देश आहे. याच प्रकल्पांचा भाग म्हणून आपल्या मुलांना किंवा स्टार्टअप क्षेत्रात काही तरी करू इच्छिणाऱ्या कोणालाही, त्यांच्या मनातल्या कल्पना साकार करण्यासाठी शक्‍य ती सगळी मदत देण्याचे प्रयत्न ‘सकाळ’ करेल.

आज स्वातंत्र्यदिनी आमचे नवे उपक्रम आपल्यापर्यंत पोचवताना आनंद वाटतो. सत्तर वर्षांपूर्वी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, कारण परकी सत्तेच्या जोखडातून स्वतंत्र व्हावं ही प्रत्येक भारतीयाची इच्छा होती. स्वातंत्र्य मिळणं हा या सार्वत्रिक इच्छेचा परिपाक होता. राजकीय स्वातंत्र्य तर मिळालं आहे; पण आपल्याला अनेक गोष्टींपासून स्वातंत्र्य हवं आहे. मुख्यतः मानसिक पातळीवर हे स्वातंत्र्य हवे आहे. आपल्या प्रश्‍नांना उत्तरे मिळवण्यासाठी आपण दरवेळी सरकारवर किंवा आणखी कोणावर का अवलंबून राहायचं? आपल्या प्रश्‍नांची उत्तरं शोधण्याकरता आपणच एकत्र येऊया. रस्ते तयार होतात आणि दरवर्षी त्यावर खड्डे पडतात. हे टाळता येणार नाही काय? रस्त्याच्या कामाला सुरवात झाल्यापासूनच, अगदी रस्त्याचे टेंडर निघाल्यापासून ते काम पूर्ण होईपर्यंत त्यावर लोकांचे लक्ष असेल तरच ते शक्‍य आहे.

यशस्वी आणि समृद्ध जगण्यासाठी चांगल्या गुरूची, मार्गदर्शकाची गरज असते. आपले आई-वडील, शिक्षक आणि समाज आपल्यावर संस्कार करत असतात. शिक्षक आणि समाजाकडून व्यक्तीवर होणाऱ्या संस्कारांना दृढ करण्यात ‘सकाळ’चा खारीचा वाटा म्हणजे ‘सकाळ’चे हे उपक्रम आणि महाराष्ट्रातल्या अडीच ते तीन कोटी लोकांपर्यंत पोचलेला ‘सकाळ’ समूह निर्माण करत असलेली ही व्यासपीठे आहेत. लोकांच्या सहभागाशिवाय आपल्याला अपेक्षित बदल परिवर्तन शक्‍य नाही. ‘सकाळ’ याचसाठी आपल्याला साद घालतो आहे. कोणीतरी येऊन आपले प्रश्‍न सोडवेल ही शक्‍यता नाही, यासाठी आपणच आपल्याला मदत करणारी यंत्रणा उभी करावी लागेल. ही यंत्रणा फक्त चुकांवर, त्रुटींवर बोट ठेवून बाजूला होणारी नसेल तर त्यावर सगळ्यांना बरोबर घेऊन उत्तरं शोधणारी असेल. ‘तनिष्कां’नी हे करून दाखवलं आहे. आता आपण सगळे एकत्र येऊन एकमेकांची मदत करूया.

शांती, सहयोग आणि समृद्धी या त्रिसूत्रीच्या आधारावर पुढच्या दशकाचा विचार करून ‘सकाळ’ने यासाठीचा एक आराखडा तयार केला आहे. या सगळ्या प्रवासात आपल्यासाठीही शिकणाऱ्याची किंवा शिकवणाऱ्याची भूमिका असू शकते. आपल्यापैकी प्रत्येकाला इथे सहभागाची संधी आहे. आपल्यापैकी काही जण वेळ देऊ शकतात, काहींच्या अनुभवाचा इतरांना फायदा होऊ शकतो, काही जण या सगळ्या प्रयत्नांना आर्थिक बळ देऊ शकतात. ‘सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्‍यन्तु मा कश्‍चिद्दुःखभाग्भवेत्‌ ।’ ही प्रार्थना आपण सगळे करत आलो आहोत. ही प्रार्थनाच ‘सकाळ’च्या या प्रयत्नांचा गाभा आहे. सर्वांचे चांगले व्हावे, यासाठी सर्वांनी एकत्र या; येत्या पाच दहा वर्षांत आपल्या जगण्याचा दर्जा सुधारणारे बदल घडवायचे तर या व्यापक चळवळीचा भाग व्हा.

ज्येष्ठांचं संघटन... ‘सिम्पल’
‘सकाळ’च्या वतीनं समाजातील ज्येष्ठ नागरिकांचंही संघटन उभं केलं जाणार आहे. ‘सीनियर युथ मूव्हमेंट फॉर पीस लर्निंग अँड एन्जॉयमेंट - सिम्पल’ या नावानं ज्येष्ठांसाठीचं हे नेटवर्क राज्यभरात तयार होईल. ज्येष्ठांसाठी रंजनापासून ते त्यांच्या अनुभवाचा परिवर्तनाच्या कामात सहयोग घेण्यापर्यंत आणि त्यांना कालसापेक्ष नवी कौशल्यं शिकवण्यापर्यंतचे उपक्रम ‘सिम्पल’द्वारे होतील. खास ज्येष्ठांसाठीचं नियतकालिक तसंच डिजिटल प्लॅटफॉर्मही ज्येष्ठांच्या सेवेत असेल. समाजसंशोधक डॉ. आनंद करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे नेटवर्क काम करणार आहे. याविषयीचे तपशील यथावकाश जाहीर करीत आहोत.

Web Title: Abhijit Pawar Writes About Sakal Media Group Development Programme

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top