गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्यात ११ महिन्यात १४ टक्के रस्ते अपघातामध्ये वाढ; १३५६६ लोकांचा बळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

सुसाट रस्ते आणि वाहन वेगावर नियंत्रण राहत नसल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी रस्त्यांवर वाहन अपघाताची आकडेवारी वाढली असल्याचे धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे.

Accident : गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्यात ११ महिन्यात १४ टक्के रस्ते अपघातामध्ये वाढ; १३५६६ लोकांचा बळी

मुंबई - सुसाट रस्ते आणि वाहन वेगावर नियंत्रण राहत नसल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी रस्त्यांवर वाहन अपघाताची आकडेवारी वाढली असल्याचे धक्कादायक आकडेवारी महामार्ग पोलिसांच्या नोंदीवरून पुढे आली आहे. गेल्यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यात २६५३५ एकूण अपघात होऊन १२१७० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता होता. तर २०७३४ लोकांना गंभीर दुखापती झाल्या, यातुलनेत यावर्षी रस्ते वाहन अपघातामध्ये वाढ झाल्याचे चित्र पुढे आले असून, एकूण ३०१२० अपघातामध्ये १३५६६ लोकांचा बळी गेला आहे. तर २४७२२ लोकांना गंभीर दुखापतींचा सामना करावा लागला आहे. ज्यामध्ये अनेकजण नेहमीसाठी दिव्यांग झाले आहे.

महामार्ग पोलिसांनी राज्यातील जिल्ह्यांसह काही मोठे शहर मिळून एकूण ४५ जिल्हे आणि शहरांच्या रस्ते अपघाताच्या आकडेवारीची नोंद केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक नियमाचे काटेकोर पालन व्हावे यासाठी महामार्ग पोलीस आणि परिवहन विभागाकडून वेळोवेळी जनजागृती केली जाते. शिवाय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार रस्ता सुरक्षा कक्ष सुद्धा प्रत्येक राज्यात उभारण्यात आला आहे. त्याप्रमाणेच महाराष्ट्रात सुद्धा परिवहन विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य समिती आणि प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समित्या तयार करण्यात आल्या आहे. मात्र, त्यानंतरही रस्ते वाहन अपघातांच्या आकडेवारी मध्ये घट होत नसल्याचे दिसून येत आहे.

यावर्षी सर्वाधिक वाहन अपघातामध्ये गेल्या ११ महिन्यात जास्त मृत्यूची संख्या नाशिक, पुणे , अहमदनगर, जळगांव, सोलापूर, नागपूर, सातारा, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात दिसून येत आहे. त्याप्रणेच ११ महिन्यात मुंबई शहरात १६७८ अपघात झाले असून, त्याप्रमाणेच अहमदनगर १४७०, नाशिक १३२९, पुणे १४४९, कोल्हापूर १०८५ आणि यवतमाळ जिल्ह्यात ११२९ अपघात झाले असल्याची नोंद महामार्ग पोलिसांनी केली आहे.

२०२१ - २०२२ या दोन वर्षाची तुलना

गेल्यावर्षी एकूण रस्ते अपघात २६५३५ झाले असून, त्यापैकी ११३०५ या जीवघेण्या अपघातांमध्ये १२१७० लोकांचा बळी गेला आहे. तर ९७५१ गंभीर अपघातांमध्ये १४४२९ लोकांना गंभीर दुखापती झाल्या आहे. ३६२४ अपघातांमध्ये ६३०५ लोक किरकोळ जखमी झाले असून विना दुखापत १८५५ अपघात झाले आहे.

यातुलणेत सर्वप्रकारच्या अपघातांमध्ये वाढ झाली असून, यावर्षी एकूण अपघातांमध्ये १४ टक्याने वाढ होऊन एकूण ३०१२० अपघात झाले आहे. यापैकी १२५०७ जीवघेण्या अपघातांमध्ये १३५६६ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. १११६४ अपघातांमध्ये १७७४२ लोकांना गंभीर दुखापती झाल्या आहे. तर ४०६१ अपघातांमध्ये ६९८० लोक किरकोळ जखमी झाले आहे. तर विना दुखापती २३८९ अपघात झाले असल्याची नोंद महामार्ग पोलिसांनी केली आहे.