"हिटलरने लोकशाहीचा उदो उदो केला" ; सुप्रिया सुळे -भाजपमध्ये ट्विटर वार! Supriya Sule vs BJP | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Supriya Sule vs BJP

Supriya Sule vs BJP : "हिटलरने लोकशाहीचा उदो उदो केला" ; सुप्रिया सुळे -भाजपमध्ये ट्विटर वार!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले आहे. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीचे समर्थक, कार्यकर्त्यांवर होणाऱ्या कारवाई संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

या कारवाया लोकशाहीच्या मूल्यांच्या विरोधात असून सर्वसामान्यांचा व्यक्त होण्याचा घटनात्मक अधिकार अशा पद्धतीने हिसकावून घेण्याचा प्रयत्न शासकीय यंत्रणा आणि सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. हे अतिशय गंभीर असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

दरम्यान भाजपने सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' म्हणजे काय? सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड तुमच्याकडून 'अभव्यक्ती स्वातंत्र्य' यावर ज्ञान देणारे ट्विट येणे म्हणजे, हिटलरने लोकशाहीचा उदो उदो करण्याइतके आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मागील २.५ वर्षात जितेंद्र आव्हाड यांनी उन्माद केला, असे भाजपने म्हटले आहे.

यावेळी भाजपने काही घटनांचा पाळा वाचला आहे. ५ एप्रिल २०२० रात्री पावणे १२ च्या जवळपास जितेंद्र आव्हाड यांनी अनंत करमुसे यांच्या घरी गुंड पाठवून त्यांचं अपहरण केले. बंगल्यावर नेऊन अमानुषपणे मारहाण केली. आज तेच आव्हाड आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गोष्टी करत आहेत, असे भाजपने म्हटले आहे.

५ ऑगस्ट २०२० ला नवी मुंबईत सुनैना होली यांना उद्धव सरकार विरोधात ट्विट केल्याने, सगळे कायदे धाब्यावर बसवून रात्री साडे १० वाजता अटक करणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गोष्टी करत आहेत. सोशल मीडियात लिहिणाऱ्यांना अटक करण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला.

२१ वर्षीय निखील भामरे या कॉलेज तरुणाला ३९ दिवस तुरुंगात ठेवण्यात आले. ते फक्त आणि फक्त जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरून. आव्हाडांनी खरं तर प्रायश्चित करावं, सत्तेचा गैरवापर, सत्तेचा उन्माद आव्हाडांनी खूप दाखवला होता आणि तेच आव्हाड अभिव्यक्ती बद्दल बोलत असल्याचे भाजपने म्हटले आहे.

शेकडो कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे असे आहेत, त्यांना त्यांच्या घरी जाऊन मारहाण करण्यात आली, निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांचे डोळे फोडण्यात आले, मुंडन करण्यात आले. तेंव्हा नाही आठवलं का अभिव्यक्ती स्वातंत्र्य?, असा सवाल भाजपने केला आहे.

टॅग्स :BjpSupriya Sule