केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात; पवारांवरील पोस्ट भोवली | Sharad Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ketaki Chitale

केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात; पवारांवरील पोस्ट भोवली

मुंबई : टीव्ही अभिनेत्री केतकी चितळेला (Ketaki Chitale) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका करणं चांगलंच महागात पडलं असून, या प्रकरणी ठाणे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, केतकी चितळेवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहे. तर दुसरी केतकी चितळेच्या पोस्टवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील पत्रक जारी करत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. (Marathi Actress Ketaki Chitale Detain By Thane Police )

केतकी चितळेवर गुन्हे दाखल

केतकी चितळे हीने फेसबूकवर केेेलेल्या पोस्टनंतर तीच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेल्या या पोस्टमध्ये शरद पवारांवर, अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका केली आहे. त्यामुळे केतकी विरोधात पुण्याच्या कळवा पोलीस ठाण्यामध्ये कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पुण्यातदेखील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केतकीची पोस्ट काय?

केतकीने केलेल्या पोस्टमध्ये "ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतोय नरक" असे शब्द वापरण्यात आले आहेत, या आक्षेपार्ह पोस्टनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका स्विकारली आहे. यानंतर या पोस्टवर अनेक स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून, केतकी चितळेने ही पोस्ट करुन भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेशाची भावना, तेढ, वैमनस्य निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.

राज ठाकरेंकडून तीव्र शब्दात निषेध

टीव्ही अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. याबाबत मनसेकडून पत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरूध्द तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर असल्याचे म्हटले आहे.

पत्रात नेमकं काय ?

कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.

महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरूध्द तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुध्दीही आपण ओळखतो.. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत...! आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे.

हेही वाचा: केतकी चितळे पुन्हा बरळली; शरद पवारांविषयी केली आक्षेपार्ह पोस्ट

चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरूषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवंतानी आपल्याला शिकवलं! कोणीही ह्या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा!

पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती ह्या खरंच आहेत की नवा वाद उकरून काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरू आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे! कारण ह्या अशाच चार-दोन विकृत टाळक्यांमुळे समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होते, समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता राज्यकर्त्यांनाही समजलं असेलच. हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच, राज्यसरकारनं ह्याचा नीट छडा लावून ह्या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा.

Web Title: Actress Ketaki Chitale Detain By Thane Police In Controversial Post On Sharad Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top