
कृषी तंत्रज्ञानाला ‘एआय’ची जोड
पुणे : जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि बारामती अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्यातर्फे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कृषी तंत्रज्ञान आणि पर्यावरण बदलाशी संबंधित अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. या अभ्यासक्रमाची औपचारिक घोषणा इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या भारत दौऱ्यामध्ये शुक्रवारी करण्यात आली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला.
इंग्लंडचे पंतप्रधान जॉन्सन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून, विविध क्षेत्रांमधील उभय देशांच्या सहकार्याबाबत त्यांची दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा झाली. यामध्ये अणुऊर्जा, संरक्षण, व्यापार यांसारख्या क्षेत्रांमधील सहकार्य करारांबरोबरच कृषी, पर्यावरण बदलासारख्या क्षेत्रांतील करारांचाही समावेश होता. या अंतर्गत ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि बारामतीच्या अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि एआयसी-एडीटी बारामती फाउंडेशनतर्फे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर अॅग्रिकल्चर टेक्नॉलॉजी अॅन्ड क्लायमेट चेंज’ हा अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. अलीकडेच ऑक्सफर्ड विद्यापीठातील कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे संचालक डॉ. अजित जावकर यांच्या उपस्थितीत या अभ्यासक्रमाला प्रारंभ करण्यात आला आहे.
या कराराबाबत भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त ॲलेक्स एलिस यांनी सांगितले, ‘‘पंतप्रधान जॉन्सन आणि पंतप्रधान मोदींनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित परस्पर सहकार्याला पुढे नेण्यासाठी सामाईक भूमिका जाहीर केली आहे. तंत्रज्ञानातील महासत्ता असलेल्या या दोन देशांमध्ये या क्षेत्रातील आर्थिक विकासासाठी प्रचंड क्षमता आहे.’’
अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टला कृषी क्षेत्रातील कामांचा ५० वर्षांचा अनुभव असून, कृषी आणि हवामान बदलाच्या आव्हानांवर काम करण्यासाठी या दोन्ही संस्था एकत्र आल्या आहेत. ट्रस्टची स्थापना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे थोरले बंधू डॉ. डी. जी. ऊर्फ अप्पासाहेब पवार यांनी १९६८ मध्ये केली.
हवामान बदलासाख्या महाकाय समस्येशी दोन हात करण्यासाठी एआयचे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना हे आव्हान स्वीकारण्याची व त्याच्याशी दोन हात करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. कृषी क्षेत्राशी निगडित खऱ्या समस्यांवर काम करण्याची संधी या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहे.
- डॉ. अजित जावकर, संचालक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स : क्लाऊड ॲन्ड एज इम्प्लिमेंटेशन्स, ऑक्सफर्ड विद्यापीठ
Web Title: Addition Ai Agricultural Technology Agreements Between Oxford And Baramati Agro Announcement Prime Minister United Kingdom Boris Johnson
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..