
राज्यातील लाखो शाळांमध्ये सध्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची पडताळणी आणि वॅलिडेशनची कार्यवाही सुद्धा सध्या सुरू आहे.
Aadhar Card : पुणे जिल्ह्यातील २ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची माहिती 'आधारकार्ड'शी न जुळणारी
पुणे - राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची पडताळणी आणि वॅलिडेशनची कार्यवाही वेग घेत असताना पुणे जिल्ह्यातील तब्बल दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे आधारकार्ड उपलब्ध असलेल्या माहितीशी जुळत नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आधारकार्डमधील चुका आणि पडताळणीत येणाऱ्या अडचणींमुळे शाळांच्या संचमान्यतेवर त्याचा परिणाम होणार की काय, या भावनेने शिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे.
राज्यातील लाखो शाळांमध्ये सध्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची पडताळणी आणि वॅलिडेशनची कार्यवाही सुद्धा सध्या सुरू आहे. परंतु हे करत असतानाच शाळांना अंतरिम संचमान्यता उपलब्ध झालेल्या आहेत. त्यात आधारकार्ड पडताळणीमध्ये विद्यार्थ्यांचे आधारकार्ड जुळत नसल्याने त्यांची संख्या कमी नोंदविली जात आहे. परिणामी, अंतरिम संचमान्यतेत शाळांमधील शिक्षक, कर्मचाऱ्यांची पदे कमी झाल्याचे दिसून येते.
मुख्याध्यापक महामंडळाचे साकडे
आजपर्यंत सरकारच्या आदेशानुसार प्रत्येक विद्यार्थ्याचे आधारकार्ड लिंक करण्याचे काम शाळांनी केले आहे. परंतु शाळांमध्ये रजिस्टरवर नोंद असलेली विद्यार्थ्यांची माहिती आणि आधारकार्ड पडताळणीतील विद्यार्थ्यांच्या माहितीत तफावत आढळत आहे. त्यामुळे शाळांच्या अंतरिम संचमान्यतेत पदे कमी होत असल्याने शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी आणि अधिक चर्चेसाठी मुख्याध्यापक महामंडळाच्या प्रतिनिधींना वेळ मिळावा, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना दिले आहे.
विद्यार्थ्यांची आवश्यक ती कागदपत्रे पाहून शाळेच्या नोंदवहीत योग्य नोंदी झाल्या आहेत. दरम्यान, आधारकार्ड काढताना विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख, लिंग यामध्ये चुका झाल्याचे दिसून येते. त्यामुळे विद्यार्थ्यांची नोंदवहीतील माहिती आणि आधारकार्डमधील माहिती यात तफावत आढळत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांची संख्या कमी नोंदविली जात असून, त्याचे पडसाद अंतरिम संचमान्यतेवर उमटले आहेत. यामुळे शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांची संख्या कमी होण्याची भिती आहे.
- महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ते, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ
शिक्षकांच्या प्राधान्यक्रमावरील सध्याची कामे
दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम
शाळांमधील परीक्षा आणि त्यातील उत्तरपत्रिका तपासणी
विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपलोड करण्याचे काम
आधार जोडणीचे फायदे
इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या निश्चित करण्यासाठी
संचमान्यता निश्चितीसाठी उपयुक्त
संचमान्यतेनंतर शाळानिहाय विद्यार्थी संख्येवरून शिक्षकांची संख्या निश्चित करणे
केंद्र व राज्याच्या विविध योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ घेण्यासाठी
विविध शिष्यवृत्त्यांसाठी आवश्यक
आधारकार्ड नोंदणीची सद्यःस्थिती (आठवड्यातील आकडेवारीनुसार)
इयत्ता पहिली ते बारावीच्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या - १९,५०,२५५
अपलोड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या - १८,५०,६३७
माहिती न जुळलेले एकूण विद्यार्थी - २,१४,७५८
शाळांच्या अंतरिम संचमान्यतेचे कामकाज आता थांबविलेले आहे. आधारकार्ड पडताळणी आणि वॅलिडेशनसाठी आणखी एका महिन्याची मुदत दिली आहे. शाळांना आता ३० एप्रिलपर्यंत आधार अपलोड करता येणार आहेत. त्यानंतर अंतिम संचमान्यता जाहीर करण्यात येईल. दरम्यान शिक्षकांकडे आधारकार्ड पडताळणी आणि वॅलिडेशनसाठी पुरेसा अवधी दिलेला आहे.
- सुनंदा वाखारे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, पुणे जिल्हा परिषद
आधारकार्डमधील माहिती न जुळलेले विद्यार्थी
कारण संख्या
आधारकार्ड न जुळणे ८८,०६८
नाव न जुळणे ८९,९७३
लिंग न जुळणे ३,६१८
जन्मतारीख न जुळणे २०,२२०
नाव आणि जन्मतारीख न जुळणे १०,६४६
नाव आणि लिंग न जुळणे १,६४२
लिंग आणि जन्मतारीख न जुळणे ५९१