esakal | फॉर्म्युला ठरला? आदित्य ठाकरे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री....
sakal

बोलून बातमी शोधा

Aditya Thackeray is news Cm Rumor on social media

सोशल मीडियावर सुरु असलेल्या या चर्चेच्या धर्तीवर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे मुख्यमंत्री तर रोहित पवार हे उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना जोरदार उधाण आले आहे. तसेच, दिल्ली किंवा नागपूरला फोन करून उपमुख्यमंत्री पद घ्यायचे की, बारामतीला फोन करून मुख्यमंत्रीपद हे उद्धव ठाकरेंना ठरवायचे आहे. अशा आशयाचे मेसेज देखिल सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

फॉर्म्युला ठरला? आदित्य ठाकरे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री....

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि निकालानंतर महाराष्ट्रात वेगळी समिकरणे उदयाला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसून, त्यांच्या जागा कमी होऊन त्यांना 105 जागांवर समाधान मानावे लागले आहे, त्यामुळे त्यांचे स्वबळावर सत्तास्थापन करण्याचे स्वप्न भंगले आहे.

शिवसेनेला एकूण 56 जागा मिळाल्या असल्याने भाजपला शिवसेनेला सोबत घेणे गरजेचे आहे. पण, शिवसेना ही पहिल्यापासून आदित्य ठाकरे यांच्यासाठी उपमुख्यमंत्रीपदावर अडून बसलेली आहे. त्यातच निकालापूर्वी शिवसेनेच्या या मागणीला पूर्णपणे भाजपने नकार दिला असला तरी, काल निकाल लागल्यापासून मात्र, राज्यात सत्तेची नवीन समीकरणे  उदयाला येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडे सध्या एकूण 98 जागा आहेत. तर, शिवसेनेकडे 56 जागा आहे हे तीन पक्ष मिळून 144 चा बहुमताचा आकडा पार करु शकतात अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

सोशल मीडियावर सुरु असलेल्या या चर्चेच्या धर्तीवर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे मुख्यमंत्री तर रोहित पवार हे उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना जोरदार उधाण आले आहे. तसेच, दिल्ली किंवा नागपूरला फोन करून उपमुख्यमंत्री पद घ्यायचे की, बारामतीला फोन करून मुख्यमंत्रीपद हे उद्धव ठाकरेंना ठरवायचे आहे. अशा आशयाचे मेसेज देखिल सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

दरम्यान, भाजपची प्रत्येक अडचण समजून घेणे आता अशक्‍य असल्याचे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे तर, आता शिवसेनेने ठरवायचे आहे की, त्यांनी भाजपच्या किती दबावाखाली राहायचे, काँग्रेसकडे प्रस्ताव आल्यास आम्ही केंद्रीय नेतृत्वाची परवानगी घेऊ, असे महत्त्वपूर्ण विधानही या धर्तीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व नवनिर्वाचित आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

अब की बार, 220 पार', अशी गर्जना करत निवडणुकीच्या रणांगणात महाजनादेशासाठी उतरलेल्या भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीला प्रत्यक्षात मात्र निसटत्या जनादेशावरच समाधान मानावे लागले. विरोधी पक्षाला जेमतेम 25 ते 30 जागा मिळतील, हा सरकारचा दावा जनतेने फेटाळून लावत कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या पदरात जवळपास शंभर जागांचे दान टाकत विजयी शतक साजरे केले असल्याने एकूण आता नेमकी काय समीकरणे उदयाला येतील हे येणारा काळच सांगेल.

पक्षनिहाय बलाबल
भाजप........105
शिवसेना...........56
राष्ट्रवादी......54
कॉंग्रेस...........44
बहुजन विकास आघाडी.........3
एमआयएम....................2
माकप....................1
जन सुराज्य शक्ती...............1
क्रांतिकारी शेतकरी पार्टी..............1
महाराष्ट्र नवनिर्माण सेना................1
शेकाप..............................1
प्रहार जनशक्ती पार्टी.................2
राष्ट्रीय समाज पक्ष............1
समाजवादी पक्ष..............2
स्वाभिमानी पक्ष....................1
अपक्ष..........13

loading image