विधानसभा निवडणुकांसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

विधानसभा निवडणुकांसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून ईव्हीएम, मनुष्यबळाची उपलब्धता, प्रशिक्षण आदी सर्व पूर्वतयारी झाली असून नि:पक्ष, निर्भय आणि पारदर्शी पद्धतीने निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज दिली.

विधानसभा निवडणूक पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी श्री. सिंह यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, सहमुख्य निवडणूक अधिकारी‍ शिरीष मोहोड, अनिल वळवी, उपमुख्य निवडणूक‍ अधिकारी आबासाहेब कवळे उपस्थित होते.

हा पत्रकार संवाद केवळ निवडणूक पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी असून निवडणूक तारखा जाहीर होण्याशी काहीही संबंध नाही असे  प्रारंभीच स्पष्ट करत सिंह यांनी मतदार यादी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आदींबाबत यावेळी माहिती दिली. ते म्हणाले, विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आल्यानंतर दि. 31 ऑगस्ट, 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात आली आहे. असे असले तरी नामनिर्देशनाच्या अखेरच्या दिवसापूर्वी 10 दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणी करता येत असल्याने यापूर्वी नोंदणी करु न शकलेल्या मतदारांना अजूनही मतदार नोंदणीची संधी आहे, असेही ते म्हणाले.

31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार राज्यात एकूण 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 मतदार असून त्यामध्ये 4 कोटी 67 लाख 37 हजार 841 पुरुष, 4 कोटी 27 लाख 5 हजार 777 महिला आणि 2 हजार 593 तृतीयपंथी मतदार आहेत. 15 जुलै, 2019 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारुप मतदार यादीनुसार 4 कोटी 63 लाख 27 हजार 241 पुरुष, 4 कोटी 22 लाख 57 हजार 193 महिला आणि 2 हजार 527 तृतीयपंथी असे एकूण 8 कोटी 85 लाख 86 हजार 961 मतदार होते. 15 जुलैनंतर नंतर मतदार यादीमध्ये सुमारे 10 लाख 75 हजार 528 इतके नवीन मतदार यादीमध्ये समाविष्ट झाले आहेत; तर 2 लाख 16 हजार 278 इतके मतदार वगळण्यात आले आहेत.

विहित केलेल्या कार्यपध्दतीचे पालन करुन मयत, अन्यत्र स्थलांतरीत, किंवा दुबार नोंदणी झालेल्या काही मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. अंतिम मतदार यादीतील तसेच वगळण्यात आलेल्या नावांची यादी https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, तहसिलदारांच्या कार्यालयात ठेवण्यात आल्या आहेत. तेव्हा मतदारांनी आपले नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही याची पडताळणी करून घ्यावी आणि वगळण्यात आलेल्या नावांबाबत समस्या असल्यास पुन्हा योग्य पुराव्यांच्या आधारे मतदार नोंदणी करुन घ्यावी.

ऑनलाईन मतदार नोंदणी तसेच यादीतील तपशीलात बदल करण्यासाठी ऑफलाईनबरोबरच ऑनलाईन सुविधाही उपलब्ध असून www.nvsp.in या संकेतस्थळाचा त्यासाठी वापर करावा.

(सौजन्य : डीजीआयपीआर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com