पालकांसाठी महात्त्वाची बातमी! ‘या’ तारखेपासून आरटीईचे प्रवेश होणार सुरु

अशोक मुरुमकर
Sunday, 21 June 2020

आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रवेशाची तारीख निश्‍चित झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणार नाही, या दृष्टीने तात्पुर्त्या स्वरुपात ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.

सोलापूर : आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रवेशाची तारीख निश्‍चित झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणार नाही, या दृष्टीने तात्पुर्त्या स्वरुपात ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.  
वंचित व दुर्बल घटकातील मुले शिक्षणापासून वंचित राहु नयेत म्हणून सर्व माध्यमाच्या शाळेत २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. मात्र, यावर्षी महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे या प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाला. शाळा कधी सुरु होणार हे अद्याप निश्‍चीत झालेले नाही. मात्र, मुलांना शालेय पुस्तकांचे वाटप झाले आहे. अशात आरटीईअंतर्गत देण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेशच झालेले नव्हते. त्यामुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना सर्व माध्यमांच्या विनाआनुदानीत शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. ही प्रक्रिया पुर्णत: ऑनलाइन लॉटरी पद्धतीने होते. मात्र यंदा शैक्षणिक वर्ष कधी सुरु होणार हेही अद्याप निश्‍चित नाही. अशा स्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप झाले. मात्र, आरटीईअंगर्तत प्रवेश झाले नसल्याने त्यांना पुस्तक कशी मिळणार हा प्रश्‍न निर्माण झाला होता.
सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड म्हणाले, आरटीईचे प्रवेश हे इंगजी व मराठीसह सर्व माध्यमाच्या विनाआनुदानीत शाळांमध्ये दिले जातात. त्यांना पुस्तके दिली जात नाहीत. त्यांचे शुल्क नियमानुसार संबंधित शाळांना दिले जाते. याची प्रक्रिया पूर्णत: लॉटरी पद्धतीने होते. यंदा कोरोनामुळे प्रवेश झाले नाहीत. आता याचे वेळापत्रक आले आहे. त्यानुसार बुधवारपासून (ता. २४) तात्पुरत्या स्वरुपानुसार प्रवेश दिले जाणार आहेत. यासाठी संबंधित पालकांना बोलवून प्रवेश दिले जाणार आहेत. गर्दी होऊ नये म्हणून एका एका पालकाला बोलावले जाणार आहे. त्यानंतर त्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. त्यासाठी स्थानिक प्राधिकारणाची मान्यता घेतली जाणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर कोणीही येणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. आता प्रवेश देताना कागदपत्राची तपासणीही केली जाणार नाही. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भव कमी झाल्यानंतर एखाद्याचे पडताळणीत चुकीचे कागदपत्र निघाले तर त्यांना शुल्क भरावे लागणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून इतर विद्यार्थ्यांप्रमाणे त्यांनाही ऑनलाईन शिक्षण दिले जाणार आहे.

राज्यातील प्रवेशाची स्थिती
राज्यात ३६ जिल्ह्यांमधून आरटीईअंतगर्त आरटीईच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार प्रवेश घेण्यासाठी दोन लाख ९१ हजार ३७० अर्ज आले आहेत. यामध्ये मोबाईल ॲपचा वापर करुन फक्त पाच अर्ज आले आहेत. नेट कॅपी किंवा मदत केंद्रातून अर्ज केलेल्यांची संख्या दोन लाख ९१ हजार ३६५ आहे. यातील एक लाख ९२७ जणांचे सिलेक्शन झाले आहे. तर प्रवेश मात्र अद्याप एकाही विद्यार्थ्यांचा झालेला नाही. आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी राज्यात नऊ हजार ३३१ शाळा आहेत. मोबाईलद्वारे अर्ज केलेल्यांमध्ये हिंगोली, कोल्हापूर, मुंबई, पुणे या जिल्ह्यांचा सामवेश आहे. यात मुंबईतून दोन अर्ज आले आहेत तर बाकीच्या सर्व ठिकाणाहून एक- एक अर्ज आला आहे. राज्यात आरटीईच्या एक लाख १५ हजार ४४६ जागा आहेत.

आकडेवारी
जिल्हे : ३६
आरटीई स्कूल : ९३३१
आरटीईच्या जागा : ११५४४६
ऑनलाइन अर्ज : २९१३६५
मोबाईल ॲपवरुन अर्ज : ०५
एकूण अर्ज : २९१३७०
सिलेक्शन : १००९२७
प्रवेश : ००


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Admission of students under RTE in Maharashtra will start from 24 th