पगारवाढीनंतर एसटी कर्मचाऱ्यांना उत्पन्नवाढीचेही टार्गेट! | Maharashtra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पगारवाढीनंतर एसटी कर्मचाऱ्यांना उत्पन्नवाढीचेही टार्गेट!
पगारवाढीनंतर एसटी कर्मचाऱ्यांना उत्पन्नवाढीचेही टार्गेट!

पगारवाढीनंतर एसटी कर्मचाऱ्यांना उत्पन्नवाढीचेही टार्गेट!

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : एसटी कर्मचाऱ्यांना नव्या वेतन करारानुसार पगारवाढीची घोषणा परिवहनमंत्री अ‍ॅड. अनिल परब (Anil Parab) यांनी केली. नोव्हेंबरपासून पगारवाढ लागू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळावर (Maharashtra State Transport Corporation) दरमहा अंदाजित 170 कोटींचा भार पडणार आहे. उत्पन्न व खर्चात ताळमेळ घालून महामंडळ अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रत्येक आगारातील कर्मचाऱ्यांना उत्पन्नाचे वाढीव उद्दिष्ट दिले जाईल. त्याचे नियोजन युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

हेही वाचा: एसटी महामंडळ 'या'मुळे खड्ड्यात! 700 बस खरेदीची निविदा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे सद्य:स्थितीत कायमस्वरूपी 92 हजार 266 कर्मचारी असून जवळपास साडेपाच हजार कंत्राटी कर्मचारी आहेत. दरमहा या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर जवळपास 290 कोटींचा खर्च होतो. दुसरीकडे बसगाड्यांचे इंधन, देखभाल-दुरुस्तीवरील खर्चही मोठा आहे. सध्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत बसगाड्यांची संख्या अपुरी असून आता नव्याने सातशे बसगाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. तत्पूर्वी, एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याच्या मागणीसाठी 24 ऑक्‍टोबरपासून कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. या काळात महामंडळाला जवळपास 300 कोटींचा फटका बसला आहे. लांबलेला संपाचा तिढा वेतनवाढीच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून झाला आहे. परंतु, वेतनवाढीनंतर महामंडळाच्या तिजोरीवर पडणारा अतिरिक्‍त भार भरून काढण्यासाठी प्रत्येक आगाराला (आगारातील कर्मचाऱ्यांना) उत्पन्नवाढ करावी लागणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले. परिवहनमंत्री परब यांनीही उत्पन्नवाढीच्या दृष्टीने एसटी बसचे सध्याचे मार्ग, अधिक प्रवासी मिळणाऱ्या नव्या मार्गांचा अभ्यास सुरू असल्याचे सांगितले आहे.

विलिनीकरणाच्या मार्गात अनेक अडथळे

एसटी महामंडळ विलिनीकरणाच्या मुद्‌द्‌यावर ठाम असलेले कर्मचारी आता मागे हटायला तयार नाहीत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्‍त समिती त्यावर अभ्यास करीत आहे. परंतु, खासगी वाहतुकीत वाढ झालेली असतानाच महामंडळाला दरवर्षी उत्पन्नाच्या तुलनेत जवळपास चारशे ते साडेचारशे कोटींचा भुर्दंड सोसावा लागत आहे. दुसरीकडे एसटी महामंडळाचे विलीनीकरण केल्यानंतर राज्यातील इतर 55 महामंडळांसह पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, आशासेविका, कोतवाल यांचेही आंदोलन होऊ शकते. या पार्श्‍वभूमीवर एसटी महामंडळाचे विलीनीकरण अशक्‍यप्राय समजले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर कर्मचारी 'वेतनवाढ नको विलिनीकरण हवे' या मागणीवर ठाम आहेत.

हेही वाचा: 22 फुटवे अन्‌ 50 कांड्यांचा ऊस! अडीच एकरात 241 टन उत्पादन

महामंडळाची सद्य:स्थिती...

  • एकूण बस गाड्या : 14,000

  • कर्मचाऱ्यांची संख्या : 92,266

  • वार्षिक उत्पन्न : 6,600 कोटी

  • एकूण खर्च : 7,020 कोटी

  • दरवर्षीचा संचित तोटा : 420 कोटी

loading image
go to top