नगरी दणक्‍याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी घायाळ..!

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 29 डिसेंबर 2018

मुंबई - पुणे महानगरपालिकेच्या अभद्र युतीनंतर आता अहमदनगर महापौरपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या नगरी दणक्‍याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी घायाळ झाल्याचे चित्र आहे. "राष्ट्रवादी'चे आमदार संग्राम जगताप यांच्या गटाला भाजपने सत्तेच्या सावलीत खेचताना त्यांच्यावर असलेल्या गंभीर फौजदारी गुन्ह्यांना बगल देत अभद्र युतीच्या सत्तेचे शिखर गाठले. चौथ्या क्रमांकाचे नगरसेवक असतानाही भाजपने राष्ट्रवादी व बसपच्या सोबतीने महापौरपद मिळविले. मात्र, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना या बेरजेच्या राजकारणाने हवालदिल केले असून, आघाडीतल्या कुरघोडीला पुन्हा बळ मिळण्याचे सूतोवाच आहे.

सर्वांत मोठा पक्ष शिवसेना मात्र या निवडणुकीत तोंडघशी पडला असून, भाजपने साम-दाम-दंड नितीने शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात बाजी मारली आहे. भाजपचे रणनीतीकार जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या डावपेचांना पुन्हा एकदा यश आल्याने उत्तर महाराष्ट्रात महाजन यांच्या नेतृत्वाची छाप गडद झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी "भाजपला मतदान करू नका' असे वारंवार स्थानिक नेत्यांना आदेश दिले होते. मात्र, अहमदनगर शहरात नुकतीच झालेली शिवसेना पदाधिकाऱ्यांची हत्या अन्‌ त्यातून सुरू झालेला शिवसेना-राष्ट्रवादीचा कडवा संघर्ष या युतीचा आधार असल्याचे मानले जाते.

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हत्येचा थेट आरोप आमदार संग्राम जगताप यांच्यावर करण्यात आला होता. त्यांना अटकदेखील करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनवर हल्ला करून जगताप यांची सुटका केली होती. इतका गंभीर गुन्हा असतानाही भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने राजकीय क्षेत्रात सत्तेपुढे शहाणपण चालत नसल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले हे आहेत. त्यामुळे सत्तेची सहानुभूती मिळण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी केल्याचे बोलले जाते.

...कारणे दाखवा नोटीस...
दरम्यान, अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीमध्ये भाजपसोबत जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. अहमदनगरमध्ये महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने समविचारी पक्षांशी आघाडी करून लढवली होती. महापौर-उपमहापौर निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना या पक्षांना पाठिंबा देऊ नये, अथवा त्यांच्या बाजूने मतदान करू नये, असे स्पष्ट आदेश पक्षाच्या वतीने असतानाही भाजपला मतदान करून पक्षादेश डावलला आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmadnagar Municipal Mayor Election Congress NCP BJP Shivsena Politics