अजयने सासऱ्याला मागितली मुलगी व‌ नारळ! मे महिन्यात होता विवाह, पण आई-वडिलांचा लाडका अजय... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ajay lutte
अजयने सासऱ्याला मागितली मुलगी व‌ नारळ! मे महिन्यात होता विवाह, पण आई-वडिलांचा लाडका अजय...

अजयने सासऱ्याला मागितली मुलगी व‌ नारळ! मे महिन्यात होता विवाह, पण आई-वडिलांचा लाडका अजय...

सोलापूर : वडिल विमा रुग्णालयातून सेवानिवृत्त झाले होते...वय झाल्याने आई थकली होती. मुलीचा विवाह झाला, ती सासरी सुखी आहे. मुलगा अजयचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले होते... अजयचा ९ मे रोजी विवाह होणार असल्याने वयस्क आई-वडिल आनंदी होते. पण, मित्रांसोबत देवदर्शनासाठी तिरूपतीला गेलेल्या अजयला बुधवारी (ता. २५) वाटेतच काळाने हिरावून नेले आणि वयस्क आई-वडिलांचा आधार क्षणातच नाहिसा झाला.

अजय लुट्टे हा जुळे सोलापूर भागातील कुमठेकर हॉस्पिटलजवळ राहात होता. ऋषिकेश जंगम, मयूर मठपती, रोहन इराणी, राहूल ईराणी, श्री नेर्लेकर, अथर्व टेंभूर्णीकर, अंबादास कुमार असे खूपजण त्याचे अनेक मित्र. बारावीनंतर अजय स्वत:च कमवून शिक्षण घेत होता. त्याला शेअर मार्केटची प्रचंड आवड.

आई-वडिल वयस्क झाल्याने अजय हा बंगळुरुचा जॉब सोडून सोलापुरात आला होता. अजय आता कमावता झाला होता. अजयच्या बहिणीला दोन मुले, तिही आता मोठी झाली होती. अजयचा विवाह तीन महिन्यांनी होणार असल्याने ते सर्वजण खूश होते. विशेष म्हणजे अजयने पुण्याला जावून २२ जानेवारीला बहिणीला माहेरी आणले होते.

त्याच्या दुसऱ्याच दिवशी अजय दोन दिवसांत परत येतो म्हणून तिरूपतीला मित्रासोंबत गेला होता. दर्शन झाल्यानंतर त्याने निघालो असल्याचे कॉल करून घरी कळवले. पण, आई-वडिलांचा आज्ञाधारक एकुलता एक अजयला काळाने अर्ध्यातूनच हिरावून नेल्याच्या दु:खातून त्याचे कुटुंब अजूनही सावरलेले नाही.

मागच्या वर्षी गेला नसल्याने आता गेला

इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशनमधून बीई झालेल्या अजयला शेअर मार्केटची प्रचंड आवड. उच्च शिक्षण घेऊन सोलापुरातून पुण्याला जाणाऱ्या तरूणांना सोलापुरातच जॉबची मोठी संधी असल्याचे तो आवर्जुन सांगायचा. जुळे सोलापूर परिसरात तो सर्वांचाच लाडका झाला होता. मित्रांनी त्याला तिरूपतीला यायला आग्रह केला आणि मागच्या वर्षी तो तिरूपती दर्शनाला गेला नसल्याने त्याने होकार दिला. तिरूमला येथून येताना महामार्ग ओलांडणाऱ्या चौघांना वाचवताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला आणि त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. त्यात अजय लुट्टे हा देखील होता.

मुलगी अन्‌ नारळ, असा ठरवला विवाह

अजयने बारावीनंतरचे शिक्षण स्वत:च्या पैशांवरच पूर्ण केले होते. व्यसनापासून दूर अजयचा आई-वडिलांना अभिमान होता. दोन महिन्यांपूर्वी त्याचा विवाह ठरला आणि ९ मे रोजी विवाहाची तारीख ठरली होती. विवाह ठरवताना मुलगी आणि नारळ, एवढीच त्याने अपेक्षा ठेवली. त्यावर विवाह जमला होता, अशी आठवण त्याच्या मित्रांनी सांगितली.