
कामगिरीने पदाचा गौरव वाढवावा
नाशिक : मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी दहशतवादी अजमल कसाब यास जिंवत पकडल्याने महाराष्ट्र पोलीस दलाची शान वाढली. तसेच पद अन् कामगिरीने माणूस हा सरस ठरत असल्याने पोलीस उपनिरीक्षकांनी पदाचा गौरव चांगल्या कामगिरीद्वारे वाढवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या ११९ व्या तुकडीचा दीक्षांत आणि संचलन सोहळा झाला. यावेळी पवार बोलत होते. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ, अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार, पोलिस अकादमीचे संचालक राजेशकुमार आदी उपस्थित होते. या सोहळ्यात उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी व बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच सोर्ड ऑफ रिव्हॉलवरचा मान गणेश चव्हाण यांना देवून उपमुख्यमंत्र्यांनी गौरविले. उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी महिला पुरस्काराचा मान तेजश्री म्हैसाळे यांना मिळाला. द्वितीय क्रमांकाचा उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार विशाल मिंढे यांना तर स्टडीज सिल्व्हर बॅटेन पुरस्काराने प्रतापसिंह डोंगरे यांना गौरविले.
मुख्यमंत्र्यांसह गृहराज्यमंत्री अनुपस्थित
उपनिरीक्षकांच्या दीक्षांत अन् संचलन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहराज्यमंत्री सतेज पाटील (शहर) आणि शंभुराजे देसाई (ग्रामीण) हे उपस्थित राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. सोहळ्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री ऑनलाइन उपस्थित राहतील, असे स्पष्ट करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्र्यांसह गृहराज्यमंत्री अनुपस्थित राहिले.
उपमुख्यमंत्र्यांच्या काही ठळक घोषणा
महाराष्ट्र पोलिस अकादमीतील सराव इमारतीला शंभर टक्के निधी देणार
राज्यातील जुन्या ८७ पोलिस ठाण्याचे नूतनीकरण
प्रत्येक पोलिस शिपाई हा अधिकारी होऊन होणार सेवानिवृत्त
पोलिसांना आता आठ तासांची ड्यूटी
टप्प्याटप्प्याने राज्यात पोलिसांसाठी १ लाख घरे बांधणार
अर्थसंकल्पामध्ये पोलिस दलाच्या सक्षमीकरणासाठी १ हजार २९ कोटींची तरतूद
महाराष्ट्र पोलिस अकादमीत आल्यानंतर प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसापासूनच सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी होण्याचे ठरवले होते. खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आज उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून हा माझ्यासह कुटुंबासाठी आनंदाचा क्षण आहे..
- गणेश चव्हाण (सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी, कुर्डुवाडी, जि.सोलापूर)
Web Title: Ajit Pawar Appeals Sub Inspector Police Convocation Ceremony
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..