राज्यापालांच्या भेटीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 November 2019

ओल्या दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसाना झाले असून याबाबत सविस्तर माहिती राज्यपालांना दिली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

मुंबई : ओल्या दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसाना झाले असून याबाबत सविस्तर माहिती राज्यपालांना दिली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. शेती प्रश्नाबाबत राज्यपालांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली असून सरकार कधी स्थापन होईल हे कळायला मार्ग नाही, यामध्ये शेतकऱ्यांची फरफट होत असल्याचे पवार यांनी सांगितले.

राज्यपालांना भेटल्यावर आघाडीचे नेते बाळासाहेब थोरात आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी अजित पवार बोलत होते. शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी असून चांद्यापासून बांद्यापर्यंत परिस्थिती ही अत्यंत नाजूक असल्याने ही मदत ही तुटपुंजी असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले आहे. कर्जमाफी आणि विजबील ही माफ करण्यात यावे अशीही मागणी यावेळी केली असल्याचेही पवार यांनी सांगितले.

राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा वाढतच असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांनी आज (ता.05) राज्यपालांची भेट घेतली. राजभवनावर जाऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते हे राज्यपाल भगत सिंग कोशारी यांना भेटले आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान आणि  इतर विषयांवर राज्यपालांशी चर्चा केली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, मुंबईचे अध्यक्ष आमदार नवाब मलिक, जेष्ठ नेते छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार सुनील तटकरे या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे शिष्ठमंडळ राज्यपालांना भेटले. तसेच, काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात, आमदार अमित देशमुख, आमदार धिरज देशमुख, आमदार शरद रणपिसे, हुस्नबानू खालीफे आदी काँग्रेसचे नेतेही राजभवनावर दाखल झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar Press Conference after he meet Governor Bhagat Singh Koshyari