esakal | शिरूरमधून लढण्यास अजित पवार तयार!

बोलून बातमी शोधा

null
शिरूरमधून लढण्यास अजित पवार तयार!
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

शिरूर - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीचा पेच सुटत नसताना; खुद्द माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज या मतदारसंघातून लढण्याचे संकेत दिले. पवारसाहेबांनी सांगितले आणि पक्षाने आदेश दिला; तर शिरूर लोकसभेची निवडणूक लढवायची माझी तयारी आहे. मी निवडणूक लढविली तर निवडूनच येईल; नाहीतर पवारांची अवलाद सांगणार नाही, असा घणाघात त्यांनी केला.

शिरूर येथे कार्यक्रमानिमित्त अजित पवार आले होते. त्या वेळी त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीबाबत भाष्य केले. 

अजित पवार म्हणाले, ‘‘लोकसभेसाठी एकेक खासदार महत्त्वाचा असून, त्यादृष्टीने शिरूरची जागादेखील आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. शिरूरच्या खासदारांचा महिमा आता संपला आहे. त्यांच्याविरोधात निवडणूक सोपी आहे. धाडसाने त्यांच्याविरोधात उभे राहणाऱ्याचा विजय निश्‍चित आहे. आमच्यातील जो लढेल, त्याला निवडून आणण्याची जबाबदारी माझी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन-तीन स्थानिकांना शिरूर लोकसभेची निवडणूक लढविण्याबाबत बोललो आहे. पण ‘नको राव दादा, मला आमदारच व्हायचंय...’ अशा त्यांच्या भूमिकेमुळे आता माझी लढायची तयारी आहे. मी कालच पवारसाहेबांना सांगितले की, शिरूर लोकसभेसाठी तुम्हाला योग्य उमेदवार मिळत नसेल तर आपली लढायची तयारी आहे. हयगय करणार नाही. या मतदारसंघासाठी पक्ष जी जबाबदारी देईल, ती उचलायची तयारी आहे. मी येथून उमेदवारीचा फॉर्म भरला; तर शंभर टक्के निवडून येईल, त्याशिवाय पवारांची अवलाद सांगणार नाही. मी जे बोलतो, ते करतोच, हे लोकांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळे  पक्ष जो आदेश देईल, तो शिरसावंद्य मानून काम करू.’’