विदेशी मद्यावरील करकपातीवरुन घेरणाऱ्या विरोधकांना अजित पवारांचं उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar
विदेशी मद्यावरील करकपातीवरुन घेरणाऱ्या विरोधकांना अजित पवारांचं उत्तर

विदेशी मद्यावरील करकपातीवरुन घेरणाऱ्या विरोधकांना अजित पवारांचं उत्तर

मुंबई : राज्य शासनानं विदेशी मद्यावरील कर कपात (foreign liquor tax) केल्यावरुन विरोधकांकडून सरकारवर सातत्यानं टीका केली जात आहे. महाविकास आघाडी सरकारनं (MVA govt) इंधनावरील कर कपात करुन जनतेला दिलासा देण्याऐवजी मद्यावरील कर कपात करुन जनतेला नशेत ठेवण्याला प्रोत्साहन दिलं जातंय असा आरोप केला जात आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी असं करण्यामागील स्पष्टीकरण दिलं आहे. (Ajit Pawar reply to opposition critisism over reducing tax on foreign liquor)

हेही वाचा: SSC HSC Exam : विद्यार्थ्यांना मिळणार परीक्षेसाठी जादा अर्धा तास

राज्य विधीमंडळाचं उद्यापासून (बुधवार) हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन चर्चेला येणाऱ्या विषयांची माहिती दिली. यावेळी विदेशी मद्यावरील करकपातीवर स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले, "मधल्या काळात विदेशी मद्यावरील कर कपात करण्यात आली. यावर विरोधकांकडून 'सस्ती दारु, महंगा तेल' असं एक वातावरण तयार केलं गेलं. पण मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला सांगायचं आहे की, पहिल्यापासूनच हा कर ३०० टक्के इतक्या मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला होता. माझ्याकडे सीमाशुल्क विभागाचीही जबाबदारी आहे. मी संपूर्ण देशातील राज्यांची माहिती घेतली त्यावेळी लक्षात आलं की, इतका मोठा कर कुठल्याही राज्यात लागू नाही. आम्ही हा कर इतर राज्यांच्या प्रमाणात आणण्याचा प्रयत्न केला तरीही तो अजूनही अधिकचं आहे. त्यामुळं मद्यावरील कर कपात करण्यामागे सरकारची वेगळी काहीही भूमिका नाही. कधी कधी आपण अव्वाच्या सव्वा कर लावला तर त्यामुळं अनेक नवे प्रश्न निर्माण होतात. यामध्ये कर चुकवण्याचं प्रमाण वाढतं, परराज्यातून मोठ्या प्रमाणावर मद्याची तस्करी होते. यासांरख्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर वाढायला लागल्या होत्या. त्यामुळंच राज्य शासनानं कर कपातीचा निर्णय घेतला"

हेही वाचा: हिवाळी अधिवेशनात कोणत्या मुद्यांवर होणार चर्चा? अजित पवारांनी दिली माहिती

दरम्यान, राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि इतर भाजप नेत्यांनी या मुद्द्यावरुन राज्य सरकारला वारंवार कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही काळापूर्वी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केला. त्यामुळं देशभरात पेट्रोल दर दहा ते पंधरा रुपयांनी स्वस्त झालं. यानंतर मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व भाजपशासित राज्य सरकारांनी राज्याचा व्हॅट कमी केला होता. पण महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारनं अद्याप व्हॅट कमी केलेला नाही. यावरुनच राज्यातील भाजपच्या नेत्यांनी सरकारला टार्गेट केलं आहे. भाजपचे क्रमांक दोनचे नेते असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नुकताच पुणे दौरा झाला यावेळी 'सस्ती दारु, महंगा तेल' असा शब्द प्रयोग त्यांनी राज्य सरकारवर टीका केली होती.