अजित पवार आमदारांसोबत म्हणाले, ‘शरद पवार आगे बढो, हम तुम्हारे साथ है’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत परतल्याने आमदारांमध्ये उत्साहाचं वातावरण असून शपथविधीसाठी सभागृहात जाण्याआधी घोषणाबाजी करण्यात आली. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ‘शरद पवार आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘राष्ट्रवादी जिंदाबाद’ अशा घोषणा अजित पवारांच्या उपस्थितीत देण्यात आल्या.

मुंबई :  राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडल्या. देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सोबत घेऊन शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अजित पवार पुन्हा राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबामध्ये परतले.

अजित पवार पुन्हा स्वगृही परतल्याने पक्षातील कार्यकर्ते आणि नेते सध्या त्यांचं स्वागत करत आहेत. अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत परतल्याने आमदारांमध्ये उत्साहाचं वातावरण असून शपथविधीसाठी सभागृहात जाण्याआधी घोषणाबाजी करण्यात आली. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ‘शरद पवार आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘राष्ट्रवादी जिंदाबाद’ अशा घोषणा अजित पवारांच्या उपस्थितीत देण्यात आल्या.

यावेळी धनंजय मुंडे यांच्यासहित राष्ट्रवादीचे इतर आमदारही उपस्थित होते. राष्ट्रवादीशी बंडखोरी करणारे अजित पवार पुन्हा स्वगृही परतल्याने पक्षातील कार्यकर्ते आणि नेते सध्या त्यांचं स्वागत करत आहेत. सोशल मीडियावरही कार्यकर्ते अजित पवारांचे आभार मानत असून, अनेकजण अजित पवारांनी भाजपासोबत जाणं शरद पवारांची खेळी होती असा दावा करत आहेत. अजित पवार यांनी मंगळवारी रात्री शरद पवारांची भेट घेत पुन्हा सगळं काही आलबेल झालं असल्याचं दाखवून दिलं.

दरम्यान, शपथविधी होण्याआधी प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी सांगितलं की, ‘मी राष्ट्रवादीतच होतो, राष्ट्रवादीसोबतच आहे आणि राष्ट्रवादीसोबतच राहील. कारण नसताना कोणतेही गैरसमज करू नका. पवारसाहेब आमचे नेते आहे त्यांना भेटणं माझा अधिकार आहे”.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातील सत्तापेच सुटला. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांसह इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी स्थापन करण्यात येत असून, आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत असल्याचे या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री बनतील. त्यांचा शपथविधी गुरुवारी शिवाजी पार्कवर होणार आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडी म्हणजेच महाविकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठक वांद्रे-कुर्ला संकुलातील ट्रायडेंट हॉटेलमध्ये मंगळवारी झाली. या बैठकीत महाविकास आघाडीचे नेते आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव सुचवणारा ठराव मांडला, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यास अनुमोदन दिले. या नव्या आघाडीबद्दल उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासह सोनिया गांधींचे आभार मानले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar said Sharad Pawar go ahead we are with you