Ajit Pawar: लोकप्रतिनिधींना वागण्याचं तारतम्य नाही; अजित पवारांनी राज्य सरकारला फटकारलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar NCP

Ajit Pawar: लोकप्रतिनिधींना वागण्याचं तारतम्य नाही; अजित पवारांनी राज्य सरकारला फटकारलं

शिंदे-फडणवीस सरकारला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, सत्ताधाऱ्यांमधील लोकप्रतिनिधींना वागण्याचं तारतम्य राहिलेलं नाही अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फटकारले आहे.

तीन महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परखड सवाल उपस्थित केले आहेत.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारला १०० पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. नव्याचे ९ दिवस असतात हे मान्य. पण लोकप्रतनिधींना कशा पद्धतीने वागायचं याचं तारतम्य राहिलेलं नाही. यांचे लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना म्हणतात ‘तुमच्या बापाची पेंड आहे का? किती वाजता आला? तुमची वाट बघायला आम्ही काय तुमच्या बापाचे नोकर आहोत का? कानाखाली आवाज काढल्यानंतर तुम्हाला समजेल’. महाराष्ट्रात ही भाषा? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही का?” अशा शब्दांत अजित पवारांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना जाब विचारला आहे.

तसेच, एवढ्यावरच हे थांबलेलं नाही. काही मंत्र्यांच्याही अर्वाच्य भाषेत संवाद साधणाऱ्या ऑडिओ क्लिप व्हायल झाल्या आहेत. त्यात नेमका आवाड मंत्र्यांचाच आहे की कुणी नकली आवाज काढला हे समजलं पाहिजे. मंत्र्याला बदनाम करण्यासाठी कुणी कारस्थान केलंय का हेही तपासा. अशी पवारांनी मागणी केली आहे.

पण जर मंत्रीच ‘काम नाही का रे तुम्हाला सणासुदीचं? दिवसभरात ५०० फोन लावता? मी ती परीक्षा रद्द केली. फोन ठेव’, अशी भाषा वापरत असतील तर? ही भाषा? एक तर बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे. भरतीच्या नुसत्या घोषणा सुरू आहेत. तरुण-तरुणी आशेनं त्या विभागाच्या मंत्र्यांना फोन करतात. पण त्यांची फोनवर ही भाषा आहे. यासाठी त्यांना मंत्री केलंय का? याचंही उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे”

यासोबतच, सरकारने, मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. यांच्या आमदारांनी तारतम्य ठेवलं पाहिजे. यांच्या लोकप्रतिनिधींना कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणी दिलेला नाही. याची नोंद सरकारने घेतली पाहिजे. अशा शब्दात अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना फटकारले.