Ajit Pawar : अजित पवारांचा कट्टर समर्थक CM शिंदेंसोबत? मुख्यमंत्र्यांच्या गाडीतूनही केला प्रवास Ajit Pawar's strong supporter Anna Bansode meet and talk Eknath Shinde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांचा कट्टर समर्थक CM शिंदेंसोबत? मुख्यमंत्र्यांच्या गाडीतूनही केला प्रवास

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक मोठे नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. मोठमोठे नेते आमदार, खासदार पक्षांतर करताना दिसून येत आहेत. अशातच पिंपरी मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आज (मंगळवारी) मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे आणि अण्णा बनसोडे यांनी एकाच गाडीतून प्रवासही केला. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांची राजकीय कारकीर्द राष्ट्रवादी पक्षातून सुरू झाली. अण्णा बनसोडे हे सुरुवातीला पानाची टपरी चालवत होते. तर, अजित पवारांनी विधानसभेचे थेट तिकीट देऊन त्यांना आमदार केले होते. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे एकुलता एक आमदारही फुटला तर राष्ट्रवादीला मोठा फटाका बसू शकतो त्यामुळे या भेटीचे अनेक अर्थ राजकीय वर्तुळात काढले जात आहेत.

अण्णा बनसोडे हे अजित पवार यांचे कट्टर संमर्थक म्हणून ओळखले जातात. २०१४ मध्ये अण्णा बनसोडे यांचा पराभव झाला. त्यानंतर ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. मात्र, २०१९ चा निवडणुकीत अजित पवार यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ते पुन्हा पिंपरी मतदार संघाचे आमदार झाले. त्यांच्या आजच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीने ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करतात की काय अशा चर्चा आता सुरू झाल्यात.

बनसोडे यांनी जर शिंदे गटात प्रवेश केला तर राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असणार आहे. अण्णा बनसोडे यांनी मुंबईत जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून अण्णा बनसोडे आणि अजित पवार यांच्यामध्ये आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू होत्या.

पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुढचं तिकीट दुसऱ्या उमेदवाराला दिले जाणार आहे, अशी चर्चा आहे. अण्णा बनसोडे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अंत्यविधीवेळी देखील ते मुख्यमंत्र्यांच्या जवळ गेल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे शिंदे गटात गेले तर उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे अण्णा बनसोडे शिंदे गटात जातील, अशी चर्चा आता रंगली आहे.