राज्यकर्ते कधीही सहिष्णू नसतात - प्रा. एलकुंचवार

राज्यकर्ते कधीही सहिष्णू नसतात - प्रा. एलकुंचवार

(कै. राम गणेश गडकरी नाट्यनगरी) नागपूर - 'तुम्ही म्हणाल तो धर्म आणि तुमची धर्माची व्याख्या पटली नाही तर तुम्ही आम्हाला भोसकणार किंवा जाळणार. हे सगळं बघितल्यावर मला भीती वाटते. ऐंशीव्या वर्षी माझ्या मनात विशाद दाटतो,'' अशा शब्दांत मनातील उद्विग्नता मांडल्यानंतर ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांनी, "आपले राज्यकर्ते कधीही सहिष्णू नसतात,' असे स्पष्ट मत मांडले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे आज प्रा. एलकुंचवार यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. रेशीमबाग मैदानावरील कै. पुरुषोत्तम दारव्हेकर रंगमंचावर आयोजित या सोहळ्याला संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी, मावळत्या संमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार, केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री; तसेच स्वागताध्यक्ष नितीन गडकरी, महापौर नंदा जिचकार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, आयोजन समितीचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी, प्रमुख निमंत्रक प्रफुल्ल फरकसे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

प्रा. एलकुंचवार म्हणाले, 'हल्ली धर्म या शब्दाने दचकायला होते. धर्म हा गहन आणि व्यापक विषय आहे. कुणालाही धर्म कळलेला नाही. हल्ली धर्माची जी व्याख्या केली जाते, त्याला माझा विरोध नाही; पण आपली केलेली व्याख्याच योग्य आहे हा अट्टहास कशासाठी आणि तुमचे ऐकले नाही, तर आम्ही देशद्रोही, धर्मद्रोही. हे फार अस्वस्थ करणारे आहे. हल्ली वेदांनाही चांगले दिवस आले आहेत. वेदांमध्ये प्लास्टिक सर्जरी, टेस्ट ट्यूब बेबी, विमान हे सारे होते, असे म्हणतात. मला तर वेदांमध्ये हे काहीही दिसले नाही. मला भारतीय माणसाचे औदार्य दिसले. तोच आपला धर्म होता.''

महापौर नंदा जिचकार, प्रसाद कांबळी, गिरीश गांधी यांनीही विचार मांडले. नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर यांनी प्रास्ताविक केले. तुषार दळवी आणि मधुरा वेलणकर यांनी सूत्रसंचालन केले.

'उद्‌घाटक म्हटल्यावर काटा येतो'
'नाट्य संमेलनाच्या उद्‌घाटनासाठी निमंत्रण आले, तेव्हा मला अंगावर काटा आला. नयनतारा प्रकरणापासून या शब्दाची धास्तीच घेतली आहे मी. आपला पण नयनतारा होतो की काय, अशी शंका मनात आली. पण, मला कुणी तरी नका येऊ म्हणून सांगितले असते तर आज संध्याकाळी फिरायला जायला मोकळा राहिलो असतो,'' अशी मार्मिक कोटीही प्रा. महेश एलकुंचवार यांनी केली.

नाट्यकर्मी की नाट्यधर्मी?
'धर्माच्या नावावर आपण असहिष्णू होणार असलो, तर नाट्यधर्मी हा शब्द वापरण्याचा आपल्याला मुळीच अधिकार नाही. आपण कुठली मूल्ये मानतो, कुठली नाकारतो, यावर संस्कृतीची सिद्धता असते. तेच नाटकात येते. नाट्यव्यवहार फार छोटा असला तरी त्याची दहशत वाटते, यावरून नाटक आणि धर्माच्या नावावरील व्यवहार या अभिन्न गोष्टी आहेत, हे सिद्ध होते,'' असे मत प्रा. महेश एलकुंचवार यांनी व्यक्त केले.

एलकुंचवार रुग्णालयात
ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांचे भाषण झाल्यावर पंधरा ते वीस मिनिटांनी त्यांना अस्वस्थ व्हायला लागले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणापूर्वी ते अस्वस्थ वाटत असल्याचे सांगून जायला निघाले. तेवढ्यात, रंगमंचाच्या मागच्या भागाला त्यांना उलटी झाली. त्यानंतर नंदनवन येथील सेव्हन स्टार हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com