
वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, ही गझल आहे इलाहींची. आपल्या लेखणीने मराठी गझलविश्व समृध्द करणाऱ्या प्रसिध्द गझलकार इलाही जमादार यांचे वृध्दापकाळाने निधन झालंय.
अकोला: वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, ही गझल आहे इलाहींची. आपल्या लेखणीने मराठी गझलविश्व समृध्द करणाऱ्या प्रसिध्द गझलकार इलाही जमादार यांचे वृध्दापकाळाने निधन झालंय.
इलाही जमादार आपल्याचला कळले ते गझलकार म्हणून आणि ते ज्यांच्या सुरातून कळले ते भीमराव पांचाळे..
भीमरावांनी इलाहींच्या गझला संबंध देशभर नेल्या. कविता किंवा गझल काय असते. दुष्यंतकुमार म्हणातत मै जीसे ओढता बिछाता हू वही सुनाता हू.
सर्वसामान्यांच्या जगण्याला व्यापून टाकणारी जी कविता होती ती इलाहींच्या माध्यमातून आणि भीमराव पांचाळे यांच्या स्वरांमधून समजली.
जीवनाला दान द्यावे लागते
किंवा
ऐ सनम आखोंको मेरी खुबसुरत साज दे
असे भीमरावांचे स्वर आज इलाहींचे शब्द रसिकांच्या कानांमध्ये गुंजारव घालतात.
गझल म्हणजे काय
गीत गुंजारते जीवनाचे गझल
मर्म ह्रदयातले स्पंदनांचे गझल
मुक्या मना बोलवेना जीथे
नेमकी वेदना तीच गाते गझल
किंवा
मैफलीमध्ये तीने ज्या
ऐकली माझी गझल
मैफलीमध्येच त्यांनी पाहिली माझी गझल
हेही वाचा - सुप्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचे निधन
भीमराव पांचाळे आपल्या गायनातून नेहमी या गझला गात आले आहेत.
जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा
वाटे खरा असावा, अंदाज आरश्याचा
भीमराव पांचाळे रसिक आणि गझलकार यांच्या मधले वाहक झाले. लोकांना इलाहींच्या गझला भीमरावांच्या वाटू लागल्या होत्या.
एक ओळ उर्दू मधील आणि एक उर्दू मधील असा वेगळाच प्रयोग तेव्हा समोर आला होता. तो इलाहींच्या माध्यमातूनच.
विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून इलाहींच्या कविता व गझल प्रसिध्द झाल्या.
कविवर्य सुरेश भटांनंतर मराठी गझलेला उत्तुंगतेवर नेणारे गझलकार अशीच त्यांची ओळख.
साहित्य क्षेत्रातील मोठं नाव..नाव तसं परीचयाचंच..गजलकार, गीतकार, चित्रपट गीत, मालिकांचे गीतं असं त्यांचं बरंच मोठं लिखण. आपल्या लेखणीने मराठी गझलविश्व समृध्द करणाऱ्या प्रसिध्द गझलकार इलाही जमादार यांच्या विषय आपण बोलतोय...
स्वप्नात काल माझ्या येवून कोण गेले
स्वप्नास आज माझ्या घेवून कोण गेले
स्वप्ने अशीच का ग? असतात जीवघेणी
ह्रदयास खोल जखमा देवून कोण गेले
सांगली जिल्ह्यातील दुधगाव येथे १ मार्च १९४६ चा त्यांचा जन्म. उत्तुंग गझलकार सुरेश भटांच्या नंतर जर कुणाचे नाव घेतल्या जात असेल तर ते म्हणजे इलाहीच. सबंध महाराष्ट्रभर अनेक गझलकार आहेत. नव्हे तर नव्या गझलकारांना कार्यशाळा घेऊन त्यांनी गझलेचा मळा फुलविला.
हा महान कवी पुणे येथे एका आऊटहाऊसच्या छोटया खोलीत राहत होता. त्यांच्या पुस्तकांचा आणि मांजरांचा पसारा एवढा की, खोलीत पाय ठेवायला जागा नसे. तरीही इलाहींचा प्रत्येक मित्राला घरी बोलावण्याचा आग्रह असायचा.
खोली लहान असली तरी या कवीचे मन मोठं. प्रत्येक मित्राला त्यांनी मनाच्या दालनात ऐसपैस जागा दिली.
इलाही जमादार यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात गझलेला पोसलं. आपल्या समृद्ध लेखनीतून त्यांनी एकापेक्षा एक अशा गझल दिल्या. मराठ, हिंदी आणि अनेक उर्दू मासिकांमधून त्यांच्या कविता, गझल प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या जाण्याने गझल पोरकी झाल्याची भावना गझलप्रमींमध्ये आहे.
अंदाज आरशाचा, वाटे, खरा असावा
बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा
जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा
नाही अखेर कळले, नौका कशी बुडाली
भयभीत काठ सांगे, तो भोवरा असावा
का आळ खंजिरावर, घेता तुम्ही खुनाचा?
की वाटले तुम्हाला, तो सोयरा असावा!
सुरेश भट यांच्यानंतर जमादार यांचे नाव
इलाही जमादार यांचा जन्म 1 मार्च 1946 रोजी त्यांचा सांगलीतील दुधगावमध्ये झाला. 1964 पासून त्यांनी कविता लेखनास सुरुवात केली. लिखानात जादू आणि कवितेविषयीच्या जाणीवेमुळे त्यांनी अत्यंत कमी काळात कविता आणि गझलक्षेत्रामध्ये आपले नाव कमावले. पुढे त्यांच्या गझलांना एवढी प्रसिद्धी मिळाली की, सुरेश भट यांच्यानंतर गझलेला समृद्ध करणारी व्यक्ती म्हणून त्यांचे नाव घेतले जाऊ लागले.
गझलकार इलाही जमादार यांची शब्दांवर चांगली पकड होती. शब्दांची जाण असल्यामुळे त्यांच्या कविता थेट मनाला भिडत. मराठी, हिंदी, उर्दू भाषेची दैनिकं, मासिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. 2020 च्या जलै महिन्यात ते तोल जाऊन पडल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
शब्दांचे अंतरंग जाणशील तर कळेल
अर्थांचे पोत पदर परखशील तर कळेल
मखमाली वाटेवर कळप चालतात फक्त
पायंडा तू नवीन पाडशील तर कळेल
घरभेध्या स्वप्नांना घेतलेस तू घरात
घातपात झाल्याचे पाहशील तर कळेल
लुबाडून वा लुटून सौख्य लाभले कुणास
जे आहे जवळ तुझ्या वाटशील तर कळेल
भीमराव पांचाळेंच्या स्वरांना दिले शब्दांचे कोंदण
इलाही जमादार हे महाराष्ट्रातील अनेक शहरांत आणि व महाराष्ट्राबाहरील इंदूरमध्ये स्वतंत्र काव्यवाचनाचे व मराठी गझलांच्या संदर्भातील प्रश्नोत्तरांचे जाहीर कार्यक्रम करायचे. इलाही यांनी 'जखमा अशा सुगंधी' आणि 'महफिल-ए-इलाही' या नावांचे मराठी, उर्दू काव्यवाचनाचे जाहीर कर्यक्रम केले आहेत.
अंदाज आरशाचा, वाटे खरा असावा,
बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा....
जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला,
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा...
इलाहींची ही गझल भीमराव पांचाळे प्रत्येक कार्यक्रमात आवर्जुन घेत असत.
इलाही जमादार यांचे साहित्य
मराठी – एक जखम सुगंधी, शब्दसुरांची भावयात्रा, स्वप्न तारकांचे, भावनांची वादळे (गझला व निवेदन)
हिंदी अल्बम – हिंदी पॉप गीते
संगीतिका –
हिंदी – सप्तस्वर, माया और साया, नीर क्षीर विवेक.
मराठी – स्वप्न मिनीचे
नृत्यनाट्ये :
हिंदी – नीरक्षीरविवेक
गझल संग्रह
जखमा अशा सुगंधी , भावनांची वादळे , दोहे इलाहीचे, मुक्तक आदी इलाही जमादार यांचे काव्य आणि गझल संग्रहही प्रसिद्ध आहेत.
इलाही जमादारांच्या जानदार गझला आणि गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा भावगर्भ स्वर अशी गझलधारा जगभरातल्या मराठी रसिकांना गेल्या अर्धशतकापासून चिंब करीत आली आहे. आज इलाहींच्या जाण्याने मनात आठवणींची आणि डोळ्यात अश्रूंची गर्दी झाली आहे. त्यांच्या गझलांचे स्वर मराठी वैखरीत सदासर्वदा दरवळत राहतील.
- किशोर बळी.